वनविभागाला सतत हुलकावणी देणारा सीटी १ या नरभक्षी वघाचे सध्या देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर आणि ऐकलपूरच्या जंगलात वास्तव्य असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वर्षभरापासून या वाघाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज आणि भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील जवळपास १३ जणांचे बळी घेतले. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची चमू दिवसरात्र एक करीत असून त्यांना अद्याप यश आलेले नाही.

हेही वाचा- विश्लेषण : नक्षलग्रस्त गडचिरोलीत आता नरभक्षक वाघांचा धुमाकूळ? काय आहेत कारणे?

गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ या नरभक्षी वाघामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होते आहे. गेल्या ३ महिन्यापासून ताडोब्यातील विशेष पथक या वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांना यश येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे. यामुळे शेतीची कामे ठप्प पडली आहेत. जनावरांना चरायला जंगलात घेऊन जाणे जीवघेणे झाले आहे. इतकेच नव्हे तर या परिसरातील मार्गावरून प्रवास करणेदेखील धोकादायक असल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.

Story img Loader