वन्यजीवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त
वाघांची संख्या वाढल्याचा आनंद साजरा करणाऱ्या केंद्राच्या आणि राज्याच्या वनखात्याला त्यांच्या संवर्धनाविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून सिद्ध होत आहे. गेल्या काही वर्षांत वाघिणीपासून बछडे दुरावण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. मात्र, या दुरावलेल्या बछडय़ांच्या भवितव्यासाठी वनखात्याकडे काहीही उपाययोजना नाही. पर्यटन आणि पैसा कमाविण्याच्या मागे लागलेले वनखाते दुरावलेल्या बछडय़ांचे भवितव्य पिंजऱ्यात कैद करून मोकळे होत आहे. वनखात्याच्या या भूमिकेवर वन्यजीवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दुरावलेल्या बछडय़ांच्या संगोपनासाठी वनखात्याकडे कोणतीही यंत्रणा तयार नाही. आजपर्यंत झालेल्या प्रत्येक घटनेत वनखात्याने वाघिणीच्या अनाथ बछडय़ांना प्राणिसंग्रहालयात आणून कैद करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांना शिकारीचे प्रशिक्षण देऊन जंगलात सोडण्याचा प्रयोग करण्यास राज्याचे वनखाते कधी धजावले नाही. मध्य प्रदेशसारखे राज्य पिंजऱ्यातील वाघांना त्यांच्या मुळ अधिवासात यशस्वीरीत्या पाठविण्याचा उपक्रम राबविते. महाराष्ट्रातील वनखात्याचे अधिकारी बछडे मोठे होऊनही त्यांना जंगलात सोडण्यासाठी तयार नसतात. गेल्या दीड दशकात उपराजधानीतील महाराजबाग प्राणिसंग्रहालयाने अवघ्या एक महिन्यापासूनच्या बछडय़ांना आश्रय दिला आहे. पाच-सहा वर्षांचे झालेले हे वाघ आणि वाघीण अजूनही पिंजऱ्यात कैद आहेत, तर काही दुसऱ्या प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात आले आहेत.
बछडे आले की, त्यांना महाराजबाग प्राणिसंग्रहालयाकडे सोपवून मोकळे व्हायचे, अशीच भूमिका वनखात्याची आजवर राहिली आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील बचाव केंद्र एकदाचे सुरू झाले, पण सुविधेच्या नावाखाली या केंद्रात काहीच नाही. कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नाही, प्राण्यांना रात्रभर ठेवायचे झाल्यास कर्मचारी नाही. उद्घाटनानंतर जेवढेही वन्यप्राणी उपचारासाठी आले त्यांना ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ची वाट पकडावी लागली.
२००८ मध्ये ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील वनविकास महामंडळाच्या जंगलातून दोन वाघिणींचे बछडे महाराजबागेत आणण्यात आले. जाई आणि जुई असे नामकरण केलेल्या या वाघिणीतील एक वाघीण मृत पावली. त्यानंतर जानेवारी २००९ मध्येच चंद्रपूर जिल्ह्य़ातील जुनोना परिसरातून वाघिणीचे तीन बछडे महाराजबागेत आश्रयासाठी आणण्यात आले. पेंचच्या खुल्या पिंजऱ्यात असणाऱ्या वाघांपैकी भंगाराम तळोधीचा एक नर, सुखवासीची एक मादी व गणेशपिंपरीची एक मादी आहे. त्यातील एका वाघिणीला जंगलात सोडण्याचा प्रयत्न झाला, पण प्रयोगाला उशीर झाला आणि अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता भोवली. नुकतेच चंद्रपूर येथेही आईपासून दुरावलेल्या बछडय़ांचा मृत्यू झाला. त्याआधी याच जिल्ह्य़ात पाइपमध्ये असलेल्या दोन बछडय़ांना जाळण्यात आले.
तळोधीतील बछडय़ांची आई सापडली, पण वाघिणीपासून विभक्त होऊन अनाथ झालेल्या बछडय़ांचे काय? यासाठी वनखाते तयार आहे का आणि त्यांच्या भवितव्यावर निर्णय घेण्याची मानसिकता वनखात्यातील अधिकाऱ्यांमध्ये आहे काय? गेल्या सात वर्षांंपासून दोन वाघिणी पेंचच्या खुल्या पिंजऱ्यात सडत आहेत. अनाथामधील एक नर पुण्याच्या प्राणिसंग्रहालयात गेला, तर दुसऱ्याला जन्मठेप झाली. त्या दोन वाघिणींनासुद्धा जन्मठेपच होईल
– कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक व ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ