शासकीय कार्यक्रमात एका नगरसेवकाबरोबर वनखात्यातील मुख्य वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे फलकावर झळकलेले छायाचित्र सध्या वनखात्यात चर्चेचा विषय ठरला आहे. शासकीय कार्यक्रमातील फलकांवर लोकप्रतिनिधींसोबत कुणाचे छायाचित्र असावे यासंबंधीचे काही प्रघात आहेत. विशेषत: मुख्यमंत्री त्या कार्यक्रमात असतील तर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे छायाचित्र त्या फलकांमध्ये असू शकते. मात्र, रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात या प्रघाताच्या विरोधात पायंडा पाडला गेल्याने त्याचे काय परिणाम होणार यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय कार्यक्रमात फलकयुद्ध रंगतात हे आजवर ठाऊक होते, पण येथे शासकीय कार्यक्रमातच फलकयुद्ध रंगले. त्यासाठी एका अपक्ष नगरसेवकाने जीवाचा आटापिटा केला. मुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात काही राजशिष्टाचार पाळावे लागतात. मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण कार्यक्रमापासून ते त्या कार्यक्रमस्थळी लावण्यात येणाऱ्या फलकापर्यंतची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावी लागते.
या कार्यालयाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतरच कार्यक्रम पुढे सरकतो. अंबाझरी पाणलोट क्षेत्रातील संरक्षित वनजमिनीवर जैवविविधता उद्यानाच्या भूमिपूजन सोहोळ्यात सर्वत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांच्यासह अपक्ष नगरसेवक परिणय फुके आणि त्याच्याबरोबर मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी यांचेही छायाचित्र झळकले. वनखात्यात मुख्य सचिव दर्जाचे अधिकार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांना आहेत. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्याचे छायाचित्र स्वागत फलकावर प्रसिद्धच करायचे होते तर ते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए.के. निगम यांचे करायला हवे होते. या कार्यक्रमाला ते सुद्धा हजर होते. मात्र, स्वागत फलकांवरील छायाचित्रांचा हा प्रकार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या फलकयुद्धाची कल्पना कदाचित मुख्य वनसंरक्षकांना नसेलही, पण फलकावरील हा प्रकार त्यांना दिसला नसावा का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प नागपूर वनखात्याचा आहे आणि टी.एस.के. रेड्डी हे या वनखात्याचा एक घटक आहेत. हा प्रकल्प वनखात्याचा नव्हे तर परिणय फुके आणि मुख्य वनसंरक्षकांचा आहे काय, अशीही चर्चा यानिमित्ताने रंगली. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनादेखील फलकावरील छायाचित्राची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. ही स्वागत फलके कुणी लावली याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला, पण काहीच कळले नाही, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात नगरसेवक परिणय फुके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यात चुकीचे काय, असा प्रश्न केला. हे स्वागत फलक काचिपुरा आणि माझ्या क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांनी लावले. प्रकल्प वनखात्याचा असला म्हणून काय झाले? असा उलट प्रश्न त्यांनी केला. राजशिष्टाचाराचे काय, असे विचारल्यानंतर वनखात्याला राजशिष्टाचार असेल, नागरिकांना नाही. उद्या नागरिकांना हवालदार मोठा वाटेल, तर ते हवालदाराचे छायाचित्र लावतील. नागरिक तर रेड्डी साहेबांचा जाहीर सत्कार करणार होते, पण मीच थांबवले. मात्र, मुख्यमंत्री कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर नागरिकांनी रेड्डी साहेब आणि माझा छोटेखानी सत्कार केला, असे उत्तर परिणय फुके यांनी दिले.