गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोडणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा पोंगेझरा देवस्थानात ३१ डिसेंबरच्या रात्री दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. वनाधिकाऱ्यांनी कारवाईच्या नावावर २५ हजार रुपये वसूल केले, असा आरोप दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांनी केला आहे. या निषेधार्थ मंदिर समिती व परिसरातील नागरिकांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा >>> गडचिरोलीच्या विकासाचे नवे पर्व सुरू…. मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने…..
पोंगेझरा शिवमंदिर वनविभागाच्या हद्दीत येते. पाथरी येथील रहिवासी राजेश हर्षे हे आपल्या कुटुंबासह ३१ डिसेंबरला शिवमंदिरात पूजा करण्यासाठी आले होते. मात्र, सायंकाळ झाल्याने वन्यप्राण्यांच्या भीतीने ते आपल्या कुटुंबासह मंदिरातच थांबले. याचवेळी गोंदियाचे रहिवासी बिट्टू अग्रवाल हे देखील उशीर झाल्याने घरी जाऊ शकले नाही. एकंदरीत सात ते आठ भाविकांनी रात्रभर मंदिरातच राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, रात्री १२ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने शिवमंदिर गाठले. त्यांनी हर्षे कुटुंबाला मंदिरातून बाहेर काढले आणि नवेगाव नागझिरा अभयारण्याच्या प्रवेशद्वार परिसरातील चौकीवर आणून कारवाईच्या नावावर चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले. रात्र गस्तीवर असलेले वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी अग्रवाल यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करून स्वाक्षरी न करता पावती दिली. हर्षे यांच्याकडेही अधिकाऱ्यांनी १० हजार रुपये व इतर भाविकांकडून ५ ते १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या……
याबाबतची माहिती शिवमंदिर ट्रस्ट व परिसरातील नागरिकांना देण्यात आली. यावर मंदिर समिती व परिसरातील बोळुंदा, हिरापूर, आसलपाणी येथील गावकऱ्यांनी आज संबंधित वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. प्रवेशद्वारावरील वन कर्मचाऱ्यांकडून नेहमीच भाविकांशी असभ्य वर्तन केले जाते, असा आरोप गावकऱ्यांनी केला. यामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवमंदिर परिसर वनविभागाकडून मुक्त करावा
शिवमंदिर परिसरावरून मंदिर ट्रस्ट आणि वनविभाग यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. ट्रस्टचे अध्यक्ष विजय राणे यांनी सांगितले की, हे शिव मंदिर पुरातन काळातील असून हजारो भाविकांची श्रद्धा आहे. मात्र, वनविभागाकडून नेहमीच भाविकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. ट्रस्टचे सदस्य सुरेंद्र बिसेन म्हणाले की, ३१ डिसेंबरच्या रात्री वनविभागाच्याच कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वार परिसरातील चौकीवर मद्यपान केले. त्यांनी शिवभक्तांना जबरीने मंदिराबाहेर काढले. यामुळे शिवमंदिर वनविभागाकडून मुक्त करावे, शिवभक्तांशी असभ्य वर्तन करणाऱ्या वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ट्रस्ट आणि गावकऱ्यांनी केली आहे.
‘पैशाचा व्यवहार झाला नाही’
वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे यांनी आर्थिक व्यवहाराचे आरोप फेटाळले आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ४ दुचाकी आणि १ चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. याची केवळ पावती देण्यात आली. एकाही व्यक्तीकडून पैसे घेतलेले नाही. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरील आरोप निराधार आहेत, असे बारसागडे यांनी सांगितले.