पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला निवासासाठी छत आहे, पण वन खात्याच्या आरोपीला घर तयार असूनही केवळ गृहपूजेअभावी भाडय़ाच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. शिकार, वन्यप्राणी अवयव तस्करी, वृक्षतोड, लाकूड तस्करी अशा अनेक गुन्ह्यांत आरोपी वनखात्याच्या जाळयात अडकण्याचे प्रमाण वाढल्यानंतर वर्षभरापूर्वी सेमिनरी हिल्सवर वन कोठडी तयार झाली. मात्र, या वन कोठडीला अजूनही उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.
वन खात्याच्या गुन्ह्यांच्या तुलनेत इतर गुन्हे मोठय़ा प्रमाणावर घडून येतात. तरीदेखील गेल्या काही वर्षांंत या खात्यातील गुन्ह्यांची संख्यासुद्धा मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. सापांच्या विषाची तस्करी, शिकार आणि वाघांच्या अवयवांची तस्करी, कासवांची तस्करी असे अनेक मोठे गुन्हे उघडकीस येत असताना वन खातेसुद्धा आरोपींना पकडण्यात यशस्वी होत आहे. मात्र, आरोपींच्या अटकेनंतर त्यांना ठेवायचे कुठे, असा मोठा प्रश्न या खात्यापुढे वर्षभरापूर्वी होता. विशेषत: तीन वषार्ंपूर्वी विषाच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आले तेव्हा या प्रकरणात मोठय़ा संख्येने आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींची चौकशी वन सभागृहातील वन खात्याच्या सचिवाच्या कक्षात करण्यात आली. त्यानंतर त्यांना वन खात्याच्या सचिव कक्षापासून तर वन सभागृहातल्याच विविध कक्षात ठेवण्यात आले होते. आरोपींसाठी वन खात्याच्या सचिवांचा कक्ष कसा वापरला जाऊ शकतो यावरून त्यावेळी प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसारित केल्यानंतर वन खात्यात खळबळ उडाली.
नागपुरात वन खात्याचे मुख्यालय असतानासुद्धा जंगल आणि वन्यजीवांशी संबंधित गुन्ह्यातील आरोपींना ठेवण्यासाठी वन कोठडी नव्हती. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाईमार्गे शहरांशी जुळले आहे. त्यामुळे कधी ना कधी आरोपी या शहरातून गेलेले आहेत. तीन वषार्ंपूर्वी मेळघाट वाघांच्या शिकार प्रकरणानंतर शिकारीचे एकापाठोपाठ एक प्रकरण उघडकीस आले. तेव्हा अटकेतील अनेक आरोपींनी रेल्वे मार्गाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. जून महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात १०० कासवांची तस्करी उघडकीस आली तेव्हाही या आरोपींना नागपूर रेल्वे स्थानकावरच प्रवासादरम्यान अटक करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा कासव तस्करी प्रकरणात आरोपींना पकडण्यात आले. या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना ठेवायचे कुठे, हा कायम प्रश्न वन खात्यासमोर राहिला आहे.
सापाच्या विष तस्करी प्रकरणानंतर तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस.डब्ल्यू.एच. नकवी यांनी सेमिनरी हिल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या परिसरात वन कोठडीचा प्रस्ताव तयार केला आणि दहा महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून वन कोठडी बनून तयार झाली. त्यानंतर कासव तस्करीसह इतर प्रकरणे उघडकीस येऊन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, केवळ उद्घाटनाअभावी आरोपींना या वन कोठडीच्या निवाऱ्यापासून वंचित राहावे लागत आहे. यापूर्वीही आरोपींसाठी शहरातील सीताबर्डी आणि सदर पोलीस ठाण्याचा आधार घ्यावा लागत होता. आताही वन कोठडी तयार होऊनसुद्धा आरोपींसाठी वन खात्याला शहरातील या दोन पोलीस ठाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
वन कोठडीला वर्षभरापासून उद्घाटनाची प्रतीक्षा
पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला निवासासाठी छत आहे, पण वन खात्याच्या आरोपीला घर तयार असूनही केवळ गृहपूजेअभावी भाडय़ाच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. शिकार, वन्यप्राणी अवयव तस्करी, वृक्षतोड, लाकूड तस्करी अशा अनेक गुन्ह्यांत आरोपी वनखात्याच्या जाळयात अडकण्याचे प्रमाण वाढल्यानंतर वर्षभरापूर्वी सेमिनरी हिल्सवर वन कोठडी तयार झाली. मात्र, या वन कोठडीला अजूनही उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. वन खात्याच्या गुन्ह्यांच्या […]
Written by रोहित धामणस्कर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-09-2015 at 07:36 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department prison in nagpur