नागपूर : मध्यप्रदेशात आधी रानडुकराच्या मागे धावताना वाघीण विहिरीत पडली. मध्यप्रदेश वनखात्याच्या चमूने त्यांना यशस्वीरीत्या बाहेर काढले. त्यानंतर महाराष्ट्रात वाघ विहिरीत पडला. महाराष्ट्र वनखात्याच्या चमूने त्यालाही यशस्वीपणे बाहेर काढले. पण आता बिबट्याचे पिल्लू चक्क मास्यांच्या टाक्यात पडले.

नागपूर प्रादेशिक वनखात्यांतर्गत पारशिवणी वनपरिक्षेत्रात बिबट्याचे पिल्लू मस्ती करता करता एका शेतातील माशांच्या टाक्यात पडले. शेतात अनेकजण टाक्यात मास्यांचे बीज टाकून मास्यांचे उत्पादन घेतात. गावखेड्यांमध्ये अनेकांची शेती जंगलालगत आहे. त्यामुळे शेतातील विहिरीत वन्यप्राणी पडणे हे नित्याचेच झाले आहे. पारशिवणी वनपरिक्षेत्रात देखील एका शेतकऱ्याचे शेत आहे.

शेतीतील इतर उत्पादनासोबतच या शेतकऱ्याने मत्स्यपालन देखील सुरू केले. त्यासाठी शेतातच त्याने टाके तयार केले आणि त्याठिकाणी मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला. बिबट्याचे पिल्लू खेळत असताना टाक्याजवळ आले आणि टाक्यात पडले. मास्यांचे टाके पाहण्यासाठी शेतकरी गेला तेव्हा त्याला टाक्यात बिबट पडलेला दिसून आला. शेतकऱ्याने वनखात्याच्या स्थानिक कार्यालयात ही माहिती दिली. त्याला बाहेर काढण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी नागपूर येथील सेमीनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राला मदत मागितली. 

वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्राला माहिती दिल्या नंतर वनपाल प्रशांत कोल्हे व राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांच्या नेतृत्वात बंडू मंगर, चेतन बारस्कर, स्वप्नील भुरे, कोमल गजभिये, स्वप्नील डोंगरे वनरक्षक यांनी बिबट्याच्या पिलाला पाण्याच्या टाक्यातून सुखरूप बाहेर काढले आणि उपचारासाठी सेमीनरी हिल्सवरील ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्रात आणले.

दरम्यान,  वनखात्याची चमू त्या बिबट्याच्या पिलाच्या आईचा शोध घेत आहे. आई मिळाल्यनंतर त्यांचे पुनर्मिलन करण्यात येईल. ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या चमूने याआधी देखील वाघ, बिबट्यासह अनेक वन्यप्राण्यांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एवढेच नाही तर बचाव केलेल्या वन्यप्राण्यांवर योग्य उपचार करून त्यांना यशस्वीपणे त्यांच्या मूळ अधिवासात म्हणजेच जंगलात सोडले आहे. वन्यप्राण्यांवरील अत्याधुनिक उपचारांची सुविधा या केंद्रात असून भारतातील हे पहिले “ट्रान्झिट ट्रीटमेंट” केंद्र आहे.

Story img Loader