“ती” मरणाच्या दारात पोहचली होती. त्यातून ती वाचण्याची शक्यता नव्हतीच आणि वाचली तरी पूर्वायुष्याप्रमाणे जगू शकेल याचीही शाश्वती नव्हती. मात्र, दैव बलवत्तर आणि जगण्याची जिद्द यामुळे “ती” अवघ्या दहा दिवसात पूर्णपणे बरी झाली. तिच्या जोडीदाराला भेटली आणि त्यांचा संसार पुन्हा नव्याने सुरू झाला. सात फेब्रुवारी २०११ चा तो दिवस. काथलाबोडी शिवारात कोरड्या विहिरीत वाघीण पडली. वनखात्याच्या चमूने तातडीने तिला विहिरीतून बाहेर काढले, पण तिच्या पोटातील बछड्यांना तिने गमावले.
हेही वाचा >>> विष्णू रुपात मोदी … नागपूरात पेन्टिंग प्रदर्शन ठरलं चर्चेचा विषय
तब्बल सात दिवस वनखाते आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू तिच्या सेवेत होती. वन्यजीवांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा तो दिवस उजाडला. राज्याचे तत्कालीन मुख्य वन्यजीव संरक्षक डी. सी. पंत यांनी तिला तिच्या जोडीदाराकडे परत पाठवण्याचा निर्णय घेतला. निर्णय धाडसी, पण इतिहास घडवणारा होता. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बचावकार्यात वाचवलेली वाघीण त्याच्या जोडीदाराकडे मूळ अधिवासात परत जाणार होती. तो दिवस होता १४ फेब्रुवारी २०११ म्हणजेच “व्हॅलेंटाईन डे”. तीला तिच्या अधिवासात सोडताच जोडीदाराच्या दिशेने ती धावत सुटली. २०११ ते २०२० या कालावधीत तिने चार वेळा मातृत्वाचे सुख अनुभवले. आजही ही “व्हॅलेंटाईन” काथलाबोडीत तिच्या अधिवासात आहे.