वर्धा: ६५ वर्षीय वृद्धास रखरखत्या उन्हात जमिनीवर झोपविले, बडा अधिकारी आपले दोन्ही पाय त्याच्या हातावर ठेवून नाचला, इतर सहाय्यकांची मारहाण सुरूच, शेवटी त्याच स्थितीत जंगलात फिरवून मग गाडीत कोंबले आणि अर्धमेल्या स्थितीत शेवटी घरी सोडले. वनखात्याच्या अमानवी कृतीस पोलीस खात्याची साथ. न्याय दूरच.बीड जिल्ह्यात अलीकडे ऐकायला मिळत असलेल्या ‘ खोक्या ‘ पॅटर्न सारखी क्रोर्यची परिसिमा गाठणारा हा चर्र अनुभव मात्र गांधी जिल्ह्यातील. याच शब्दात तो विधानसभेत मांडल्या गेला.वन खात्याच्या अमानुषतेस पोलीस खात्याची साथ मिळाली. आणि न्यायाचे धिंडवडे निघाले. जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातले बोरगाव गोंडी हे वन क्षेत्रातील एक गाव. येथील नारायण गोमाजी कोरोती हे ६५ वर्षीय शेतकरी होळीच्या दिवशी शेतात राखण करीत बसलेले. त्याच वेळी वन विभागाचे आरएफओ अभय तालन हे तीन कर्मचाऱ्यांसह कोरोती यांच्याकडे पोहचले.
त्यांच्यावर आग लावल्याचा आरोप केला. लगेच मारहाण सूरू केली. तळहातावर बूट रगडत एक उभा तर इतर काठीने मारू लागले. वृद्धाच्या किंकाळ्या रानातच विरल्या. शेवटी गाडीत कोंबून धानोली शिवारात नेत परत मारहाण केली. मद्यधुंद असल्याचा आरोप असलेल्या या शासकीय अधिकाऱ्यांनी मग जंगलात फिरवून अर्धमेल्या स्थितीतील कोरोती यांना गावात सायंकाळी आणून सोडले. कोरोती यांची स्थिती पाहून गावकरी संतप्त झाले. जमव पाहून या वन खात्याच्या चमुने पळच काढला.
हे भयावह हाल पाहून गावकरी पीडित कोरोती यांना घेऊन खरंगना पोलिसांकडे धाव घेतली.मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अदखलपात्र गुन्हा नोंदवून परत पाठविले. हे प्रकरण दबणार, असे गावकऱ्यांना वाटत असतांना गावातील एकाने ही बाब त्यांच्या सैन्यात असलेल्या मुलास कळविली. त्याने वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यास हा अमानुष प्रकार सांगितला. त्यांनी त्वरित दखल घेत वर्धा पोलीस अधीक्षकांना ही माहिती दिली. त्यांनी विचारणा केली. हे प्रकरण आमदार सुमित वानखेडे यांना माहित पडताच त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांस जाब विचारला. गंभीर गुन्हे कां दाखल केले नाही, अटक कां नाही, एफआयआर मध्ये आरोपी अधिकारी मद्यप्राशन केलेले असल्याचे नमूद असूनही त्यांचे मेडिकल कां झाले नाही, आरोपीना पोलिसांनी साथ कां दिली, या प्रश्नांवर उत्तरेच देण्याचे टाळण्यात आले. शेवटी आमदार वानखेडे यांनी सभागृहात ही घटना सविस्तर मांडली. तेव्हा सभापतींनी पण हक्कभंग ठराव मांडण्याची सूचना करीत नाराजी नोंदविली. शेवटी गृहखात्याचा असा चेहरा पुढे आल्याने खरंगना ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांस निलंबित करण्यात आले. आमदार वानखेडे म्हणाले की आरोपी वन अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. उशीरा रात्री संबंधित बोर प्रकल्पचे वनक्षेत्र अधिकारी अभय ताल्हन यांना पण वन खात्याने निलंबित केले आहे.