यवतमाळ : वणी तालुक्यात दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला कोलार पिंपरी जंगलात जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर आज, बुधवारी सकाळी यश आले. या वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी आणि एक तरुण जखमी झाल्यानंतर वन विभागाने या वाघाला पकडण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
वणी तालुक्यात या वाघाने काही दिवसांपूर्वी रांगणा भुरकी येथील अभय देऊळकर या युवकाला ठार केल्यानंतर २७ नोव्हेंबरला कोलार पिंपरी येथील रामदास पिदूरकर यांच्यावर हल्ला करून ठार केले होते. ब्राम्हणी येथे टॉवरचे काम करणाऱ्या उमेश पासवान या मजुरावरही वाघाने हल्ला केला. मात्र, तो वाघाच्या तावडीतून सुटल्याने बचावला. या वाघामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. यानंतर परिसरातील नागरिकांनी या वाघास वनविभागाने जेरबंद करण्याची मागणी लावून धरली.
वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी योजना आखली. पुसद येथील पथक, पांढरकवडा येथील ‘मोबाईल स्कॉड’,‘रेस्क्यू’ पथक व वणी येथील अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले. मागील आठ दिवसांपासून वन विभाग या वाघाच्या मागावर होते. याकरिता ‘ट्रॅप कॅमेरे’, पिंजरे कोलार पिंपरी परिसरातील जंगलात लावण्यात आले होते.
बुधवारी सकाळी ‘रेस्क्यू’ पथकाच्या निदर्शनास हा वाघ आला. त्याला ‘डॉट’ मारून बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. वाघाला पकडण्यात आल्यामुळे नागरिक, शेतकरी, शेतमजूर व वेकोलि कर्मचारी यांनी सुटकेचा श्वास घेतला. या वाघाला नागपुरातील गोरेवाडा येथे हलवण्यात आले आहे.