नागपूर : राज्यातील कानाकोपऱ्यात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विदर्भात वाघांचा तर मुंबई, नाशिक या परिसरात बिबट्यानी धुमाकूळ घातलाय. म्हणूनच तिकडच्या राजकीय मंडळींकडून बिबट्याच्या नसबंदीची मागणी होत आहे. मात्र, अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. आता विदर्भातदेखील बिबट्यांची संख्या तेवढीच वाढली आहे. जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील जखमी झालेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनखात्याच्या चमुला यश आले.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंग शिवारातील नाल्याच्या काठावर एक बिबट जखमी अवस्थेत फिरत असल्याचे वनखात्याच्या पथकाला दिसून आले. पथकाने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. शिरपूरकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जखमी बिबट्याचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना नाल्याच्या काठावर दोन ते तीन वर्षाचा नर बिबट जखमी अवस्थेत दिसला. याचदरम्यान नागपूर येथील सेमीनरी हिल्सवरील प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या चमुला बोलावण्यात आले.

ही चमू लिंगा शिवारात दाखल होताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश फुलसुंगे यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या बिबट्याला यशस्वीरीत्या जेरबंद केले. त्याला जाळीच्या सहाय्याने पकडून उपचारासाठी नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात नेण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक पी. एस. पाखले, मानद वन्यजीव रक्षक उधमसिंह यादव, क्षेत्रसहायक अनिल खडोतकर, वनरक्षक प्रशिक पाटील, प्रतिभा वावधने, दिनेश पडवाळ, राहुल हुलकाने, विष्णू बनसोड, श्रावण नागपुरे, सुरेश नागपुरे, राकेश बावणे, पोलिस पाटील शंकर झाडे, सुभाष किरपाल आदी उपस्थित होते.

आपसातील लढाईतून बिबट जखमी झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सेमीनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी व केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्या बिबट्यावर उपचार सुरू आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी बाहेर पडण्याचे, विहिरीत पडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यादृष्टीने उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्र वन्यप्राण्यांच्या सेवेसाठी तयार आहे.

Story img Loader