यवतमाळ : समृद्ध वनांनी व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात विविध भागातील जंगल उन्हाळ्यातील वणव्यांमध्ये होरपळत आहेत. शनिवारी रात्री यवतमाळ वनविभागातील वडगाव धानारो वनपरीक्षेत्रातील वडगाव वर्तुळांतर्गत जंगलास आग लागली. या वनवर्तुळांतर्गत वनविकास महामंडळ (एफडीसीम)सह प्रादेशिक वनविभागाच्या चारही नियतक्षेत्रातील जवळपास चार हजार हेक्टरवरील राखीव वन आणि रोपवने वणव्यात जळून नष्ट झाल्याचे सांगण्यात येते. घटनेच्या वेळी वन विभागातील कोणीही कर्मचारी घटनास्थळी हजर नसल्याने आग अधिक भडकल्याचे सांगण्यात येते.

यवतमाळ जिल्ह्यात एकूण ३०४५.२८ चौ.किमी वनक्षेत्र आहे. मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद असे तीन वन विभाग जिल्ह्यात आहे. उच्चप्रतीचे सागवान जिल्ह्यातील जंगलात आहेत. दरवर्षी उन्हाळा लागला की, जिल्ह्यातील जंगलात वणवा पेटण्याची भीती असते. अलिकडच्या काही वर्षांत तिन्ही वन विभागांतर्गत वणवा पेटण्याचे प्रकार वाढले आहेत. यवतमाळ वन विभागात गेल्या १५ दिवसांत जंगलात तिसऱ्यांदा मोठा वणवा लागला. हा वणवा आटोक्यात न आल्याने हजारो हेक्टर जंगल जळून खाक झाले.

शनिवारी रात्री वडगाव धानोरा वनपरिक्षेत्रांतर्गत चारही नियतक्षेत्रात वणवा लागला. वनविकास महामंडळा (एफडीसीम) च्या ३३१ कंपार्टमेंटमध्ये सर्वप्रथम आग लागली. ही आग विझवायला एफडीसीमचे कोणीही कर्मचारी नसल्याने हा वणवा प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत पसरला. याबाबत यवतमाळ वनविभागचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांना विचारले असता, ‘वडगाव वनपरिक्षेत्रात आग लागल्याची माहिती मिळताच शनिवारी रात्री सर्व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. फायर लाईन, फायर ब्लोअरची व्यवस्था करून रात्री अडीच वाजेपर्यंत सर्व आग आटोक्यात आणली. आपण स्वत: तिथे उपस्थित होतो’, अशी माहिती त्‍यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या आगीत वनवर्तुळातील तीन रोपवनवाटिका जळून नष्ट झाल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रादेशिक वनविभागतील कोणतीही रोपवाटिका आगीत जळाली नाही. वनविकास महामंडळाची रोपवाटिका जळाली असल्यास कल्पना नसल्याचे उपवनसंरक्षक वायभासे म्हणाले.

वडगाव जंगल हे राखीव वनक्षेत्र असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा अधिवास आहे. मात्र शनिवारी लागलेल्या आगीत वन्यजीव आणि जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची सांगण्यात येते. हा परिसर जंगलव्याप्त असला तरी, येथे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. मात्र वडगाव, कोळंबी या वनपरिक्षेत्रात वन कर्मचारी मुख्यालयी राहत असून, सतत फिल्डवर राहत असल्याचे उपवनसंरक्षक वायभासे यांनी सांगितले.

आग लागली की लावली?

यवतमाळ वन विभागात गेल्या पंधरा दिवसांत तीन जंगलांना आग लागली. अमरावती मार्गावर ढुमणापूर जंगलात लागलेल्या वणव्यात मोठी हानी झाली. त्यानंतर यवतमाळ शहरालगत गोधणी परिसरातील जंगलाला आठ दिवसांपूर्वी आग लागून वनसंपदा नष्ट झाली. वनविभागास कोट्यवधीचा निधी प्राप्त होतो. रोपवनविाटिकेसाठीही मोठा निधी मिळतो. वनविकास महामंडळाचाही स्वतंत्र निधी आहे. मार्च महिन्यात ऑडिट आदी प्रशासकीय प्रक्रिया होत असल्याने याच महिन्यात जंगलास आगी लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने विविध शंका उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे जंगलाला आग लागली की लावली जाते, हा संशोधनाचा विषय झाला आहे.