लोकसत्ता टीम

नागपूर : पैसे भरुन व्याघ्रप्रकल्पात कॅमेरे नेता येतात, मग भ्रमणध्वनीवरच बंदी का, असा थेट प्रश्न वनमंत्री गणेश नाईक यांनी वनाधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने वनमंत्री समाधानी झाले नाहीत आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात ३१ डिसेंबरला पर्यटकांच्या वाहनांनी ‘एफ-२’ वाघीण आणि तिच्या बछड्याची बराच वेळपर्यंत वाट अडवली. समाजमाध्यमावर ही चित्रफित व्हायरल होताच सर्वच स्तरातून त्यावर तीव्र पडसाद उमटले. स्थानिक पातळीवर तोकडी कारवाई झाल्यानंतर ‘लोकसत्ता’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले. यानंतर पर्यटक वाहनचालक आणि मार्गदर्शक यांच्यावरील निलंबन कारवाईत वाढ करण्यात आली. तसेच दंडात देखील वाढ करण्यात आली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल घेत स्वत:हून याचिका दाखल करुन घेतली आणि राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

आणखी वाचा-वनमंत्री गणेश नाईक म्हणाले “वाघ मुंबईपर्यत आले तर काय…”

दरम्यान, काल आणि आज ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाढत्या वन्यप्राण्यांच्या व्यवस्थापनावर राष्ट्रीय पातळीवर परिषद सुरू आहे. या परिषदेचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे देखील सहभागी झाले. त्यावेळी हा प्रश्न उपस्थित झाला. भ्रमणध्वनी बंदी का, असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी ‘युट्युबर’ कडून अशा चित्रफिती सामाईक केल्या जातात, असे उत्तर त्यांना देण्यात आले. मात्र, वनमंत्री नाईक या उत्तराने समाधानी झाले नाहीत व त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. जबाबदारी न झटकता अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवायला हवे, असे त्यांनी वनाधिकाऱ्यांना सांगितले. एवढेच नाही तर पर्यटकांना जागृत करण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आणखी वाचा-शासकीय कर्मऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्तवेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

पर्यटक वाहनातून पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडवलेच पाहीजे, पण त्यासाठी नियमावली आहे. त्या नियमावलीचे पालन व्हायलाच पाहीजे. अशाप्रकारच्या घटनांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. वाघांना त्याच्या अधिवासात शिकार मिळाली नाही तर ते बाहेर येतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे, त्याचा अभ्यास करून राज्यात देखील त्या लागू करण्यात येतील, असे ते म्हणाले. नागपुरात वाघांचे झालेले मृत्यू ही देशातली पहिली घटना आहे, प्रयोगशाळेमध्ये नमुन्यांची तपासणी करून याचे नेमके कारण शोधल्या जात आहे, या प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना देखील कुठलाही त्रास झालेला नाही, त्यामुळे यावर पुढील काही दिवसात अधिक भाष्य करता येईल, असेही वनमंत्री गणेश नाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Story img Loader