नागपूर : वनखात्याची धुरा तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन्हीवेळा यशस्वीरित्या पार पडली. त्यांच्या कार्यकाळातच खात्याचे अत्याधुनिकीकरण झाले. तत्पूर्वी या खात्याकडे फारसे कुणाचे लक्षही जात नव्हते. मुनगंटीवारांच्या काळात हे खाते चर्चेला आल्यानंतर अनेकांची नजर त्यावर पडली. यात विदर्भातील एक राज्यमंत्री आघाडीवर आहेत. अनेकदा त्यांच्या कृतीतून त्यांनी हे दाखवूनही दिले आहे. गुरुवारी पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा या राज्यमंत्र्यांनी त्यांचे बेगडी वनप्रेम दाखवले. त्यांच्या सूचना, सल्ले इतके की ‘वनमंत्री नेमके कोण’ असा प्रश्न पडावा.

वनखाते म्हटले की अर्थातच विदर्भ पहिले डोळ्यासमोर येतो. राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांपैकी पाच व्याघ्रप्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. राज्यातील सर्वाधिक वाघही विदर्भातच आहेत. अलीकडच्या काही वर्षात तर सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे देशातीलच नाही तर परदेशातील पर्यटकांचा ओढा विदर्भातील या व्याघ्रप्रकल्पांकडे वाढला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटीची देखील व्याघ्रदर्शनासाठी पहिली पसंती विदर्भातील हे व्याघ्रप्रकल्पच आहेत. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे वनखात्याच्या तिजोरीत गोळा होणारा महसूल देखील ओसंडून वाहत आहे. त्यामुळे साहजिकच या खात्याचा मोह आता अनेक राजकीय व्यक्तीमत्वांना आवरता आलेला नाही.

सलग दोन वेळा हे खाते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होते. त्यांनी खात्यावर आपली मोहर देखील उमटवली. त्यामुळे अजूनही अनेक अधिकारी, कर्मचारी त्यांचाच उल्लेख करतात. त्यांच्या कार्यकाळात या राज्यमंत्र्यांना फारसे हातपाय मारता आले नाही. त्यावेळी आमदार असताना देखील आपल्या क्षेत्रातील नसलेल्या समस्या मोठ्या करुन खात्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. खात्यातील त्यांची लुडबुड सुरूच होती, पण त्यावेळी त्यांना फार हातपाय मारता आले नाहीत. आता नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर हेच वनखाते आपल्या पदरी पडेल अशी त्यांना अपेक्षा होती. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नदेखील केल्याचे ऐकिवात आहेत. मात्र, त्यांची डाळ शिजली नाही. मात्र, या खात्याचे राज्यमंत्री (इतर खात्याचे) त्यांना मिळाले. त्यातही हे खाते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे राहिले नाही. त्यामुळे या राज्यमंत्र्यांचे चांगलेच फावले.

दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हे राज्यमंत्री देखील सहभागी होते. वनमंत्री गणेश नाईक हे सर्व विषय संयमाने हाताळत असताना हे राज्यमंत्री मात्र फारच घायकुतीला आलेले दिसून आले. एवढेच नाही तर वनमंत्र्यांना फारसे बोलू न देता स्वत:च ते खात्याशी संबंधीत विषयांवर न थांबता बोलू लागले. त्यामुळे उपस्थितांनाही काही वेळ वनमंत्री कोण हाच प्रश्न पडला.