लोकसत्ता टीम
चंद्रपूर : मला विश्वास आहे, चंद्रपुकरांच्या आशीर्वादाने लोकसभा निवडणूक जिंकणार अशी प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे होतो असेही मुनगंटीवार म्हणाले.
विविध माध्यमांच्या एक्झीट पोल नंतर या जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. मंगळवार ४ जून रोजी मतमोजणी आहे. तत्पूर्वी भाजप व कॉग्रेस या दोन्ही पक्षाच्या वतीने विजयाचा दावा केला जात आहे. अशातच महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मुनगंटीवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात राहायचे होते. त्यामुळे त्यांनी अगदी सुरूवातीपासून लोकसभा निवडणुक लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशाचे पालन करित लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदार संघात संपर्क आलेला नव्हता असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट सांगितले. असे असले तरी जनतेचा आशिर्वाद मिळणार असेही मुनगंटीवार म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेली विकास कामे याच बळावर जनता आशिर्वाद देईल असा विश्वास मुनगंटीवार यांना आहे.
आणखी वाचा-अमरावती : निकालाची उत्कंठा! नवनीत राणा, बळवंत वानखडे, दिनेश बुबसह सर्वांचेच विजयाचे दावे
१९९५ साली चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून पहिली निवडणूक जिंकली होती तेव्हाच विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही या म्हणीप्रमाणे काम करित आलो आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडक, श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. जनतेला त्यांचे लोकसभा मतदार संघातील प्रश्न काँग्रेसचा उमेदवार पाच वर्षात सोडवू शकतो असे वाटत असेल तर अधिकार जनतेचा आहे. लोकशाहीमध्ये मतदारांनी ठरवायचे आहे असेही मुनगंटीवार म्हणाले.
आणखी वाचा-नागपूर जिल्ह्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी (ईव्हीएम मतमोजणी) प्रत्येकी १४ टेबल याप्रमाणे एकूण ८४ टेबल, टपाली मतपत्रिका मोजण्याकरीता ९ टेबल आणि ईटीपीबीएमएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) मोजण्याकरीता ८ टेबल असे एकूण १०१ टेबल राहणार आहेत. तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या २४ फेऱ्या, चंद्रपूर – २८, बल्लारपूर – २६, वरोरा –२५, वणी – २५, आणि आर्णि मतदारसंघाच्या मतमोजणीच्या २७ फे-या होणार आहेत. प्रत्यक्ष मतमोजणी करीता आणि अतिरिक्त स्टाफ धरून १२० टक्के याप्रमाणे एकूण ३७९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात मतमोजणी पर्यवेक्षकांची संख्या १२२, मतमोजणी सहायक १४० आणि सुक्ष्म निरीक्षकांची संख्या १७७ आहे.
मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.