गोंदिया : उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरात पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांचे दर्शन घडते. असेच गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यातील ग्राम लेंडीजोबच्या जंगलात मंगळवार २५ मार्च २०२५ ला सकाळी ६:३० ते ७:०० वाजताच्या दरम्यान गावातील काही नागरिक मोहफुल वेचण्याकरिता, गावा जवळील जंगलात जात असताना त्यांना अस्वल दिसले. त्यांनी त्याची चित्रफित तयार करून ती समाज माध्यमावर प्रसारित केली . यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या मार्च महिन्या दरम्यान मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू आहे. त्यातच देवरी तालुका हा आदिवासी बाहुल असून, मोहफुल वेचण्याकरिता तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात जंगला मध्ये जातात. २५ मार्च रोजी देवरी तालुक्यातील ग्राम लेंडीजोब या गावचे नागरिक मोहफुल वेचण्याकरिता जंगलामध्ये गेले असताना, अचानक अस्वल दिसले ., त्यांनी या अस्वलाची चित्रफित तयार करून ती समाज माध्यमावर प्रसारित केली आहे. त्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

अस्वलाच्या दर्शनामुळे गावात कुतूहलाचा विषय तर ठरलाच आणि अस्वलाला पाहण्याकरिता गावातील लोक जंगलाच्या दिशेने धावत सुटले होते. पण या सोबतच मोहफुल वेचणाऱ्या नागरिकांच्या मनात जंगलात अस्वल दर्शन झाल्यामुळे भीतीचे वातावरण सुद्धा पसरले आहे. सध्या मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू असल्यामुळे शक्यतो नागरिकांनी रात्री अपरात्री मोहफुल वेचण्याकरिता जंगलात जाण्याचे टाळावे. तसेच जंगलात एकटा न जाता तीन ते चार लोक मिळून एकत्र जावे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगली प्राणी हे पिण्याच्या पाण्याच्या शोधात गाव शेजारी येत असतात. यापासून सावध असून स्वतःला सतर्क ठेवावे. असे आवाहन वन विभागाने केले आहे.

कारण या रविवारीच (२३ मार्च) नवेगावबांध वन परिक्षेत्रात एका वाघाने शिवरामटोला जंगल परिसरात मोहफुल वेचण्याकरिता गेलेल्या अनुसया कोल्हे (४५) या महिलेवर हल्ला करून तिला ठार करण्याची घटना घडलेली आहेच. या घटनेनंतर या वाघाला वन विभागाच्या बचाव पथकाने जेरबंद केला असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेच्या नि:श्वास घेतला आहे. त्यामुळे मोहपुल वेचणी हंगाम सुरू असताना मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता जंगल परिसरा जवळ राहणाऱ्या ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगून मोहफूल संकलन करावे असे आव्हान वन विभागाकडून करण्यात आलेले आहे.