अडचणीत सापडलेल्या वन्यप्राण्यालाच नव्हे तर शहरातसुद्धा अडचणीत सापडलेल्या प्राणी आणि पक्ष्यांच्या बचावासाठी वनखात्याचे बचाव पथक आहे. बचाव पथक तयार करतानाच मुळात पक्षी आणि प्राण्यांच्या बचावासाठी लागणारी सर्व साधणे आणि तशी वाहने असणे आवश्यक आहेत. वनखात्यातील बचाव पथकाजवळ वाहन असणे तर दूरचीच गोष्ट, पण बचावाची साधणेसुद्धा नाहीत. त्यामुळे वनखात्याच्या या बचाव पथकाच्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
जंगलात किंवा जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवणे एकवेळ सोपे आहे, पण शहरातील प्राणी आणि पक्ष्यांसाठी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवणे दिवसेंदिवस वनखात्याच्या बचाव पथकाला कठीण होत चालले आहे. नागपूर वनखात्याजवळ बचाव पथकाकडे नावासाठी केवळ एक मोठे वाहन (डग्गा) आहे. मात्र, हे वाहन केवळ वाघ आणि बिबटय़ाच्याच उपयोगात येईल असे आहे. वाहनात समोर वाहनचालक आणि एक व्यक्ती बसू शकेल एवढीच व्यवस्था असून मागे चाक असलेला पिंजरा आहे. तो सुद्धा मोठय़ा मुश्किलीने खूप फिरवल्यानंतर उघडतो. जंगलात किंवा जंगलाच्या सीमेलगत बचावकार्याचे जेवढे काम पडत नाही, तेवढे शहरात पडते.
हरीण, मोर यासारखे वन्यप्राणी आणि पक्ष्यांचा शहरातील शिरकाव आता नवीन राहिलेला नाही, पण त्याचबरोबर इतरही पक्षी आणि प्राणी अडचणीत सापडण्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातही वानरांचा हैदास नागपूरकरांसाठी नवा नाही. या सर्व परिस्थितीत जेव्हा ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवण्याची वेळ येते, तेव्हा या पथकासमोर सर्वात मोठा प्रश्न वाहनाचा असतो. उपलब्ध असलेले वाहन शहराच्या गल्लीबोळात जाऊ शकत नाही. त्यात बचाव पथकाची चमूही बसू शकत नाही. अशावेळी या पथकाला सेमिनरी हिल्सकडे असलेल्या दोन वाहनांसाठी भीक मागावी लागते.
ही वाहनेसुद्धा सरकारी कामात नसतील तरच मिळतात. कधीकधी वनमजूर ही वाहने हाताळतात. वाहन मिळाले तर वाहनचालक नसतो. अशावेळी या पथकाला इतरत्र धावाधाव करावी लागते. वानर, मोर या सारखे प्राणी आणि पक्ष्यांच्या बचावासाठी जाताना सहाय्यक वनसंरक्षकांना विनंती करावे लागते. त्यांच्याकडूनही प्रत्येकवेळी सहकार्य मिळेलच असे नाही. अखेरचा पर्याय म्हणून कधीकधी भाडय़ाने वाहन बोलवावे लागत असल्याचे बचाव पथकातील एकाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले. एकीकडे ही अवस्था आणि दुसरीकडे ‘रेस्क्यू ऑपरेशन’साठी बोलावणारे नागरिक, पथक वेळेवर पोहोचत नाही म्हणून शिव्या घालतात. बचाव पथकाची ही हतबलता वरिष्ठांच्या लक्षात येणार का? आणि अडचणीतील प्राणी व पक्ष्यांचा बचाव होणार का? हे प्रश्न गेल्या अनेक वषार्ंपासून अनुत्तरीतच आहेत.

Story img Loader