यवतमाळ : टिपेश्‍वर अभयारण्यातील ‘पीसी’ वाघिणीच्या गळ्यातील तारेचा फास काढण्यात वन विभागाला सोमवारी यश आले. मात्र याचवेळी मुकूटबन वनपरिक्षेत्रातील ‘टी-९’ वाघिणीच्या गळ्यात फास आढळून आला. गळ्यात फास अडकलेल्या एका वाघिणीचा शोध संपत नाही, तोच दुसरी वाघीण फासात अडकल्याने वन विभागात खळबळ उडाली. या वाघिणीचा शोध घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पीसी’ वाघिणीच्या गळ्यात फास अडकल्याचे १ फेब्रुवारीला निदर्शनास आल्यानंतर वन विभागाने शोधमोहीम सुरू केली होती. अमरावती येथील प्रादेशिक वन विभागाच्या चमूसह स्थानिक पथकास अखेर २५ दिवसानंतर सोमवारी सायंकाळी ही वाघिण पाटणबोरी वनक्षेत्रातील पिलखान नियतक्षेत्रात जखमी अवस्थेत आढळून आली. शीघ्र बचाव दलाचे अमोल गावनेर व त्यांच्या चमूने पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रणजित नाळे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास ‘पीसी’ वाघिणीला डॉट मारून बेशुद्ध केले. त्यानंतर वैद्यकीय चमूने तिच्या गळ्यात अडकलेला तारेचा फास यशस्वीरित्या काढला. या फासामुळे तिच्या मानेवर खोल जखम झाली आहे. त्यामुळे तिच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू करण्यात आले. औषधोपचार पूर्ण होताच या वाघिणीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार असल्याचे पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांनी सांगितले. या वाघिणीच्या बचाव मोहिमेत वन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वन्यजीव संघटना, अभ्यासकांची मोलाची मदत झाली.

‘पीसी’ वाघिण फासमुक्त होण्याच्या पूर्वसंध्येला, रविवारी पांढरकवडा प्रादेशिक वनविभागांतर्गत मुकूटबन रेंजमधील ‘टी-९’ वाघिणीच्या गळ्यात फास आढळून आला. या वाघिणीचे तीन बछडेही सोबत असल्याचे सांगण्यात येते. याबाबत पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांना विचारण केली असता, हा परिसर आपल्या अखत्यारित नाही. मात्र वाघिणीच्या गळ्यात फास अडकल्याची ऐकीव माहिती आहे. ती जखमी नसल्याचे सांगितले जात आहे. ही वाघिण अद्याप ट्रॅप कॅमेऱ्यात आढळली नाही.

पंरतु, वन विभागाने मुकूटबन परिक्षेत्रात शोधमोहीम सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य वाघांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. येथे हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांचीही सातत्याने गर्दी असते. मात्र पर्यटकांसोबतच शिकाऱ्यांचीही गर्दी टिपेश्वर अभयारण्यामध्ये वाढल्याचे दिसत आहे. वाघिणींच्या गळ्यात फास अडकल्याच्या दोन घटना उजेडात आल्याने येथे शिकारी सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे.