नागपूर : बंड विसरून जा… त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम झाला नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज गुरुवारी येथे केले. राऊत दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले असता विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी राऊत म्हणाले, मागील सरकारने घेतलेले निर्णय महाराष्ट्राचे, जनतेचे आणि लोकशाहीचे हित बघून घेण्यात आले होते. पण आता कुणी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून काम करत असेल, तर आमचे त्याकडे लक्ष आहे. विरोधासाठी विरोध म्हणून कोणत्याही सरकारने काम करू नये. मुळात महाराष्ट्रात अद्याप सरकारच अस्तित्वातच नाही. आज कॅबिनेटची बैठक केवळ दोघांमध्ये झाली. भविष्यात सत्तांतर, परिवर्तन होईल, असे संकेत राऊत यांनी दिले.
कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो. मी आता उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात आलो आहे. पक्ष संघटनेचे काम आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. सध्या जे दाखवले जात आहे, तो केवळ भास आहे. हे सर्व तात्पुरते आहे. गेल्या ५६ वर्षांत शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे. या काळात अनेक संकटे, वादळे सेनेने पाहिली आहेत. शिवसेना विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करत आहे. हळूहळू चित्र स्पष्ट होत जाईल, असा दावाही त्यांनी केला. राऊत यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार कृपाल तुमाने आणि त्यांच्या समर्थकांची अनुपस्थिती खटकणारी ठरली.
हे सरकारच घटनाबाह्य
मुळात हे सरकारच बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणे जसे योग्य नाही तसेच राजभवनातूनही त्यांना शपथ देणे बेकायदेशीर आहे. १९ जुलैला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात जर कुणी मंत्री म्हणून शपथ घेत असतील, तर ते घटनाबाह्य ठरेल, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
शिवसैनिकांची मते जाणून घेणार
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला दोन दिवसांसाठी नागपुरात पाठवले आहे. मी येथे शिवसैनिकांचे मत जाणून घेण्यासाठी आलो आहे. संघटना बांधण्याकडे आता आमचा कल आहे. सध्या पक्षाकडे जेवढे खासदार आहेत, तेवढेच लोकसभेच्या पुढील निवडणुकीतही राहतील, असा दावा राऊत यांनी केला.