अकोला : कापूस उत्पादक चळवळीचे प्रणेते डॉ. वा.रा. कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा समारोप व सहकार महामेळावा माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत १२ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यात सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्य सहभागी होणार आहेत, अशी माहिती दि अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता होणाऱ्या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार शरद पवार राहणार असून दूरदृश्य प्रणालीद्वारे नितीन गडकरी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ. अनिल देशमुख, कृषिशास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमात डॉ.वा.रा. कोरपे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या स्मृतिगंधाचे प्रकाशनसुद्धा केले जाणार आहे, असे डॉ. कोरपे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> एमपीएससी परीक्षा : अनुसूचित जातीच्या उमेदवारांना १५ हजारांचे सहाय्य
सहकार महर्षी डॉ.वा.रा. कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला ३ मेपासून सुरुवात झाली. जन्मशताब्दी महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये बँकेच्या सर्व ११२ शाखांवर ग्राहक मेळावा घेण्यात आला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘कापूस लागवडचे नवतंत्र’ व ‘कापसाचे अर्थशास्त्र’ या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली. हवामान अंदाज व पिकांच्या नियोजनावर सुद्धा कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व निबंध स्पर्धा, सेवा सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांचे मेळावे, आजी-माजी कर्मचारी स्नेहमिलन सोहळा व गटसचिवांची कार्यशाळा आदी उपक्रम राबवण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> तुम्हालाही मुलं-बाळं आहेत, हे लक्षात ठेवा.., आमदार नितीन देशमुख यांचा अधिकाऱ्यांना इशारा
आदिवासीबहुल क्षेत्रातील पोपटखेड येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये दीड हजार रुग्णांनी लाभ घेतला. त्यांना औषध व चष्म्यांचे माेफत वाटप करण्यात आले, अशी माहिती सुद्धा डॉ. कोरपे यांनी दिली. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य आदी उपस्थित होते.