लोकसत्ता टीम

वर्धा : भाजपने विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले आणि त्यात आर्वीचे माजी आमदार दादाराव केचेंचे नाव दिसताच पहिली आठवण निघाली ती केंद्रीय मंत्री अमित शहा यांची. भाजपचे चाणक्य अशी ओळख दिल्या जाणारे व पक्ष वर्तुळत दरारा ठेवून असणारे मंत्री म्हणून अमित शहा यांचा शब्द केचे यांनी प्रमाण मानला. त्याचे फळ आज दिसून आले.

काल शनिवारी केचे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बोलावून घेतले. उमेदवारीसाठी आवश्यक ती कागदपत्रे आहेत कां याची शहानिशा झाली. ती सर्व चेक झाल्यावर दादाराव केचे यांनी त्यांच्या एका सहकाऱ्यास नागपुरात बोलावून घेतले. दोघेही मग सर्व ती तयारी करीत दूरांतो गाडीत बसून रात्रीस मुंबईत पोहचले. आणि केचे यांना उमेदवारी अधिकृत जाहीर झाल्याचे कळले. चार महिन्याची धकधक वाढविणारी प्रतिक्षा संपुष्टात आली. मुंबईतून बोलतांना ते म्हणाले की मला माझ्या नेत्यांवर विश्वास होताच. तिकीट मिळणार याची खात्री होती. माझी निष्ठा फळास आली, इतकेच म्हणता येईल. उद्या १७ मार्च रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. त्यांना झालेला आनंद लपून राहला नाही.

आर्वी मतदारसंघात शून्यापासून भाजप एक पक्ष म्हणून उभा करण्यात दादाराव केचे यांचे योगदान कुणीही अमान्य करीत नाही. पुढे तर ही स्थिती की केचे बोले आणि भाजप चाले, अशी स्थिती. पक्षाचा निर्णय मान्य नाही, अशी भूमिका घेण्यापर्यंत केचेंचा वट वाढला. त्यास छेद देण्याचा पहिला प्रयत्न २०१९ च्या निवडणुकीत झाला. पण कशीबशी त्यांनी तिकीट खेचून आणली. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांना लढविण्याचे ठरले. तसेच झाल्यावर केचे यांनी बंडाचा झेंडा उभारला. वानखेडे अडचणीत येतील म्हणून केचे यांची सर्व नेत्यांनी मनधरणी केली. परंतु ते बधेना.

शेवटी त्यांना ऐन वेळेवर बावनकुळे हे थेट चार्टर्ड विमानाने अहमदाबादला घेऊन गेले. तिथे अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यावर केचे शांत झाले. अश्या पातळीवर बंडखोर उमेदवारास समजविण्याचे व नंतर अर्ज परत घेण्याचे हे त्यावेळी एकमेव उदाहरण ठरल्याची चर्चा झाली. पण आता विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यावर केचे यांना उमेदवारी मिळणार की नाही याची खात्री मात्र जिल्हा भाजप नेते देत नव्हते. कारण अर्ज तर केचे यांनी मागे घेतला होता पण मतदानाच्या दोन दिवसापूर्वी त्यांनी सुमित वानखेडे विरोधात काम केल्याची जाहीर चर्चा झाली होती. त्यामुळे पक्षातून सुधीर दिवे यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली. पण केचे ठाम होते. मलाच तिकीट मिळणार, असे ते चार दिवसापूर्वी बोलून गेले. आज ते खरे पण ठरले आहे. शहा यांनी दिलेला शब्द मोडण्यास अन्य धजावले नाही, अशी टिपणी केचे समर्थक करतात. आता आर्वीत वानखेडे व संभाव्य केचे असे दोन आमदार तसेच एक खासदार ( अमर काळे ) असा दबदबा जिल्ह्यात दिसणार.