गोंदियाः गोंदियाचे माजी आमदार व भाजप नेते गोपालदास अग्रवाल यांनी रविवार ८ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला असून ते १३ सप्टेंबर रोजी कॉग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथल्ला, प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या उपस्थित कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी गोंदिया येथील प्रताप लॉन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. काही दिवसापूर्वी गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. हे विशेष उल्लेखनीय.
गोपालदास अग्रवाल यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र मागील काही दिवसापासून ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत होते.
हे ही वाचा…नागपूर: गणेशोत्वावर ‘स्वाईन फ्लू’चे सावट..
अग्रवाल म्हणाले की, २०१९ मध्ये गोंदियाच्या विकासाला नवीन दिशा देण्याच्या उद्देशाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण या निवडणुकीत माझा पराभव झाला.गोंदिया मतदारसंघातील जनतेला मी घेतलेला पक्ष बदलण्याचा निर्णय आवडला नाही हे निकालावरून स्पष्ट झाले. त्यानंतर मी लोकसभा आणि त्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचे प्रामाणिकपणे काम केले आणि उमेदवार निवडणून आणले होते. सगळे सुरळीत सुरू असतांना राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर जिल्हयातील परिस्थिती बदलत गेली. महायुती शासनाने स्थानिक अपक्ष आमदाराला भरपूर निधी देवून माझेच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालवला होता . यामुळे मागील तीन महिण्यापासून राज्यातील पक्ष नेतृत्वाला या संदर्भात वारंवार सांगून सुद्धा काहीही फरक पडत नसल्याचे बघून मी ८ सप्टेंबर ला भाजपच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा देत असून पुढील १३ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,असे अग्रवाल यांनी सांगितले.
गोंदियातून लढवण्याचे संकेत
महाविकास आघाडीअंतर्गत गोंदिया विधानसभेची जागा ही कॉग्रेस पक्षच लढणार. या बाबतची शाश्वती पक्षातील वरिष्ठांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा झाली नाही. त्यामुळे या सगळ्या बाबींवर सविस्तर पणे आपण खुलासा करणार असल्याचेही गोपालदास अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पराभूत झाला असला, तरी त्याला गोंदिया विधानसभेतून ३५५०० मतांची आघाडी मिळवून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा..नागपूर : मध्यरात्री केला मेसेज, प्रेयसीची भेट अन् हत्याकांड…
पत्रकार परिषदेत प्रसंगी काँग्रेस चे देवरीचे आमदार सहेसराम कोरेटी, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बंसोड, काँग्रेस प्रदेश सचिव अमर वराडे, पी.जी. कटरे, विनोद जैन, गप्पु गुप्ता, प्रकाश रहमतकर, राकेश ठाकूर उपस्थित होते.