देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. या जुन्या इमारतीतून कारभार चालविणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे आहे. ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत सज्ज असून, जनहितासाठी या नवीन इमारतीचे १५ ऑगस्टला लोकार्पण करणारच असल्याचा इशारा देवरी चे आ. सहषराम कोरोटे यांनी दिला आहे.
या वरून येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणावरून काँग्रेसचे आ. सहषराम कोरोटे आणि भाजपचे माजी आ. संजय पुराम यांच्यात या रुग्णालय लोकार्पण वरुन चांगलीच जुंपली आहे. दरम्यान दोघानी एकमेकास कसे लोकार्पण करता ते बघतोच.. तर विद्यमान आमदार कोरेटे यांनी ही रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी १५ ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यावर ठाम आहेत.
हेही वाचा >>> सोलापुरातील मावळे पाच तास चालविणार शिवकालीन शस्त्र!; जिजामातांच्या भूमीत अनोखी मानवंदना
तर माजी आ. संजय पुराम यांनी केवळ श्रेय घेण्यासाठी आणि ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण होण्यापुर्वीच या इमारतीचे लोकार्पण होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
शनिवारी पुराम यांनी देवरी पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना या संदर्भात निवेदन देऊन लोकार्पणावरून कुठलाही वाद निर्माण झाल्यास अथवा कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याला आ. कोरोटे हेच जबाबदार राहतील, असे निवेदनातून म्हटले आहे.
मात्र, पुराम यांच्या या इशाऱ्यानंतर ही आ. कोरोटे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मी कामाचे श्रेय घेण्यासाठी नव्हे तर ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या जीर्ण इमारतीत रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर इमारत जीर्ण करण्यासाठी सज्ज असलेल्या सर्व सोयीसुविधायुक्त नवीन इमारतीचे लोकार्पण १५ ऑगस्टला करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाच्या इशाऱ्यामुळे मी जनहितासाठी घेतलेला निर्णय मागे घेणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे सहषराम कोरोटे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> जिल्हा परिषद आरोग्य पद भरतीत सावळा गोंधळ; कंपनीकडून आधी गुपचूप जाहिरात नंतर शुद्धिपत्रक!
ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या जीर्ण इमारतीत रुग्णांची गैरसोय होत आहे. केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा संभाव्य धोका ओळखून व रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
सहषराम कोरोटे, आमदार , देवरी
ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले. मग काम पूर्ण होण्यापूर्वीच आ. कोरोटे यांना इमारतीच्या लोकार्पणाची घाई का? हा सर्व श्रेय लाटण्याचा प्रकार आहे. संजय पुराम, माजी आमदार देवरी