वर्धा : देश महासत्ता होण्याची व मंगळावर अंतराळस्थानक स्थापन करण्याची भाषा बोलतोय. मात्र, दुसरीकडे अद्याप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी काळी अनुभवलेले अस्पृश्यपण आजही दिसून येण्याची धक्कादायी घटना घडत आहे. ते सुद्धा आज राम नवमीला आणि भाजप नेत्याच्या बाबतीत. या घटनेने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

देवळीतील राम मंदिरातील ही घटना व वाईट अनुभव घेणारे आहेत भाजपचे माजी खासदार रामदास तडस. हे राम मंदीर खूप जुने आहे. आज गावात राम नवमीची धुमाधाम सूरू असतांना रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस तसेच काही भाजप पदाधिकारी हे राम दर्शनास या मंदिरात पोहचले. त्यावेळी पूजा सूरू होती. मूर्तिच्या पूजेसाठी तडस हे गर्भ गृहात शिरत असतांना पुजाऱ्याने त्यांना रोखले.

मूर्तिची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच रहा, असे बजावले. हे ऐकून तडस चांगलेच स्तब्ध झाले. काय गुन्हा त्यांना कळलेच नाही. म्हणून त्यांनी पुजाऱ्यास विचारणा केली कां बरं मी आत जाऊ शकत नाही. तेंव्हा पुजारी महाराज म्हणाले की, तुम्ही सोवळे (पवित्र धोतर)  घातलेले नाही, जानवे नाही, नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही, बाहेर निघा. असे पुजारी बोल ऐकताच तडस यांना सुचेनासे झाले. वाद नको म्हणून ते माघारी फिरले. तडस यांनी मग सपत्नीक गाभारा सोडला. मूर्ती भोवती असलेल्या कठड्या बाहेर उभे राहून दर्शन घेतले. पूजेचे ताट हातीच राहले. मूर्तिवर त्यांना फुलं वाहता आली नाहीच.

या संदर्भात बोलतांना ते म्हणाले की यामुळे निश्चितच वाईट वाटले. या मंदिरात विविध सुधारणा करण्यास मी व गावाकऱ्यांनी वेळीवेळी मदत केली आहे. पुजारी महोदय कुटुंब पिढीजात आहे. पण सध्या पूणे येथे स्थायिक असून केवळ राम नवमीस येतात. जुने मंदीर असल्याने आमची आस्था आहे.हे ओवलं सोहळ काय लावले.

तुम्ही एक दिवसासाठी येता आणि नियम सांगता, हे बरे नव्हे. असे मी म्हटले पण पुजारी अडून बसल्याने मी वाद टाळला. सर्व ती मदत आम्ही दरवर्षी करीत असतो. असे तडस म्हणाले. मात्र, काही काल तणावाचे वातावरण झाले होते. या वेळी गावातील एका ऐतिहासिक घटनेची सर्वांना आठवण झाली. देवळी शहरात एक मोठे मंदीर आहे. त्यात हरिजन मंडळीस प्रवेश नव्हता. तेव्हा त्या काळी महात्मा गांधी यांनी पुढाकार घेत हे मंदीर सर्वांसाठी खुले केले होते. आज तर चक्क माजी खासदारास प्रवेश वर्ज्य करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्यमिश्रित संताप उमटला.