अमरावती: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १० जुलैच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरात उद्धव ठाकरे हे ‘हिंदुस्थानचे भाग्यविधाता भावी पंतप्रधान’ अशा आशयाचे शुभेच्छा फलक झळकले आहेत. शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक येथे लावण्यात आलेले हे फलक सध्या अमरावती शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.
उद्धव ठाकरे हे रविवारपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. रविवारी उद्धव ठाकरे हे नागपूर आणि यवतमाळ येथे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर रात्री आठ वाजता ते अमरावतीला येणार आहेत. सोमवारी अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच अमरावतीत येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात सर्वत्र स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.
हेही वाचा… आनंदाची बातमी…. वंदे भारतसह एसी चेअर कार, एक्झिक्युटिव्ह श्रेणीत मोठी सवलत
‘आता महाराष्ट्र नाही तर दिल्ली काबीज करू, हिंदुस्तानचे भाग्यविधाते भावी पंतप्रधान उद्धव साहेब ठाकरे यांचे अंबा नगरीत हार्दिक स्वागत.’ असा मजकूर असणारे फलक गर्ल्स हायस्कूल चौकात सर्वांचे लक्ष वेधत आहेत. आता साडेचार वर्षानंतर ठाकरे पहिल्यांदाच अमरावतीत येत असल्यामुळे, अमरावतीच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अमरावतीच्या शिवसैनिकांना नेमका कोणता संदेश देतात याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे.