नागपूर:नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कॉग्रेसचे समर्थन देण्यावरून घोळ काही संपलेला नाही. काल माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. पण त्या नेत्यांना तो अधिकार नाही, असे सांगत भाजपमधून कॉंग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना पाठिंबा जाहीर केला.
हेही वाचा >>> पटोले यांच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या आशीष देशमुख यांच्या भेटीला शिक्षक भारतीचे झाडे
या निवडणुकीत कॉंग्रेसने समर्थन कुणाला द्यायचे, यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले घोळात घोळ घालत आहेत. कॉंग्रेसचे नेते आमदार सुनील केदार यांनी काल वडेट्टीवार यांच्या घरी बैठक घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. याबाबत विचारले असता डॉ. देशमुख म्हणाले, तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. वैयक्तिकरीत्या त्यांनी अडबालेंना समर्थन दिले असेलही. पण ती कॉंग्रेसची भूमिका नाही. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसला मदत केली होती. परिणामस्वरूप ॲड. अभिजित वंजारी यांनी मोठा विजय त्याठिकाणी मिळविला होता. त्यावेळी राजेंद्र झाडे यांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी शिक्षक मतदारसंघात मदत करण्याचे वचन दिले होते. ते वचन आपण पाळत आहे आणि त्या वचनाची पूर्ती म्हणून राजेंद्र झाडे यांना आज समर्थन जाहीर केले आहे.