गोंदिया : आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून पुन्हा संधी दिली जाईल, अशी आशा होती. मात्र, पक्षातील गटबाजीमुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आली. यामुळे त्यांचे पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न भंगले. सहसराम कोरोटे तेव्हापासून नव्या पर्यायाच्या शोधात होते. ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती, ती खरी ठरण्याची चिन्हे आहे.

सहसराम कोरोटे लवकरच धनुष्यबाण हाती घेणार आहे. देवरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती त्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे हे एकनाथ शिंदे यांच्या दरबारात आपल्या समस्या घेवून गेले होते, त्यावेळी त्यांची बोलणी झाली. त्यानंतर ते शिवसेना (शिंदे) गटाच्या जिल्हा कार्यालयात तसेच शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुखांसोबत जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये दिसू लागले. माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच देवरी येथे आयोजित शिवसेनेच्या रॅली व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम चिचगड मार्गावरील नगर पंचायत क्रीडांगणात होणार आहे.

या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी सहसराम कोरोटे आपल्या समर्थकांसह दिवसरात्र काम करत आहेत. कोरोटे त्यांच्या टीमसह प्रत्येक गावात फिरत आहेत. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे शिवसेनेत प्रवेश करावा, अशी समजूत ते घालत आहेत. आता पुढील आठवड्यात होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात काँग्रेसचे कोणते नेते त्यांच्यासोबत असतील, हे पहावयास मिळणार आहे. सहसराम कोरोटे यांचा शिवसेना शिंदे गटात होणारा प्रवेश हा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का असणार आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात शिंदे सेनेला मोठे बळ मिळणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपले सुपुत्र डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्यासोबत मुंबई येथील शिवसेना कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांचाही औपचारिक प्रवेश जिल्ह्यातील जनतेसमोर याच मेळाव्यात होणार आहे.

या दोन माजी आमदारांच्या प्रवेशामुळे गोंदिया जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला चांगलेच बळ मिळणार आहे. संयुक्त शिवसेना पक्षाच्या विभागणीनंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट गोंदिया जिल्ह्यात खिळखिळे झाले होते. आता या दोन जनतेत प्रभाव असलेल्या माजी आमदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गट गोंदिया जिल्ह्यात मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावाकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तारीख सध्या निश्चित झाली नाही. पुढील आठवड्यात ती नक्की होणार आहे. मी याच कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.

Story img Loader