यवतमाळ : वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पणाच्या शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काँग्रेस विरोधात गरळ ओकून काँग्रेसचे नेते, बंजारा समाजाचे दैवत राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा अपमान केला आहे. शासकीय कार्यक्रमात पक्षाचा प्रचार करून इतर पक्षांवर आरोप करणे पंतप्रधानपदाची गरिमा घालविणारे आहे, अशी टीका काँग्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज, रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शनिवारी पोहरादेवी येथे राज्य शासनाच्या ७०० कोटी रूपयांच्या निधीतून निर्माण करण्यात आलेल्या नंगारा वास्तुसंग्रहालाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले. या कार्यक्रमात बंजारा समाजाच्या विकासाबाबत अवाक्षरही पंतप्रधानांनी काढले नाही.

हेही वाचा >>>शिव स्मारकबद्दल संभाजी राजे छत्रपतींनी काँग्रेसचाही निषेध करावा; देवेंद्र फडणवीस

बंजारा समाजावरील गुन्हेागारीचा ठपका पुसून त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रवाहात आणणाऱ्या काँग्रेसवर टीका केली. कै. वसंतराव नाईक यांनी तब्बल बारा वर्षे तर कै. सुधाकरराव नाईक यांनी दीड वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. या काळात बंजाराच नव्हे तर सर्व समाजघटाकांना या नेत्यांनी विकासाच्या प्रवाहात आणले.

मात्र, इतिहासाचा कोणताही अभ्यास नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज, धर्मगुरू रामरावबापू महाराज यांची नावे घेत याच समाजाच्या लाखोंच्या समुदायासमोर काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले कै. वसंतराव नाईक यांच्यावरच अप्रत्यक्ष टीका केली, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>>Aheri Assembly Constituency : अहेरी विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) धर्मरावबाबा आत्रामांना शह देण्यात यशस्वी ठरणार?

पंतप्रधानांनी काँग्रेसवर केवळ नैराश्यातून टीका केली आहे. पराभव समोर दिसत असल्याने महायुतीच्या पायाखालीच वाळू सरकली असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. बंजारा समाजाच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर विचार करून प्रतिक्रिया दिली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. शासकीय कार्यक्रमांमधून राजकीय विधाने करू नये, असे संकेत आहेत.

पंतप्रधान मोदी आणि भाजप, महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे राजकारण गढूळ केले, अशी टीका ठाकरेंनी केली. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे सरकार जे मागाल त देवू या वृत्तीने योजनांची खैरात करत आहे. मात्र राज्यातील नागरिक सुज्ञ आहेत. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण निवडणूक लढविण्याबाबत कोणताही विचार केला नाही. केंद्रीय कार्यकारिणी याबाबत निर्णय घेईल, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former congress president manikrao thackeray criticizes prime minister narendra modi regarding insult to the banjara community nrp 78 amy