लोकसत्ता टीम
चंद्रपूर: जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार कर्नाटकच्या निवडणुकीत अनुक्रमे भाजप व काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. मुनगंटीवार व वडेट्टीवार हे त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक बनले आहेत. राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बुधवारपासून विधानसभा निवडणूक प्रचारार्थ दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
पक्षाच्या निर्देशानुसार विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी या मतदारसंघात ते दोन दिवस प्रचार करणार आहेत. तर काँग्रेस नेतेविजय वडेट्टीवार हे मंगळवार पासूनच कर्नाटक राज्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. गोवा तथा महाराष्ट्राला लागून असलेल्या विधान सभा मतदार संघात ते काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.
आणखी वाचा- फडणवीस यांच्या नागपुरात अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून फलक
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या १० में रोजी मतदान होणार आहे. मुनगंटीवार विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार सोमानगौडा पाटील यांच्या प्रचारासाठी मुनगंटीवार सकाळी ११ वाजता विजयपूर येथे दाखल होतील. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तेथून देवर हिप्परगी कडे रवाना होतील. भाजपा उमेदवार सोमानगौडा पाटील यांची भेट घेऊन ते चर्चा करतील.
आणखी वाचा- मुख्यमंत्री संपावर गेले की सुट्टीवर? नाना पटोले यांची टीका; म्हणाले, “राज्याचे तीन तेरा…”
त्यानंतर स्थानिक भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदार संघात विविध गावांमध्ये बैठका आणि जनसंपर्क अभियानात ते सहभागी होणार आहेत.या दौऱ्यात जाहिर सभां सोबतच घरोघरी संपर्क, विविध समाजघटकांशी चर्चा व संपर्क, विविध व्यावसायिक घटकांशी संपर्क, बूथप्रमुख बैठका, भाजपा पक्षांतर्गत विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशा संघटनात्मक बाबींवरही जोर देण्यात आला आहे.
या दौऱ्यात मुनगंटीवार यांच्यासोबत स्वतः उमेदवार सोमनगौडा पाटील यांच्यासह उत्तर प्रदेश चे माजी मंत्री व मतदारसंघ प्रभारी आनंद स्वरूप शुक्ला, मतदारसंघ निवडणुक प्रभारी अनिल जमादार, मंडल अध्यक्ष भीमणगौडा सिद्दार्थ, प्रभू गौडा बिरासदार , जिल्हा परिषद सदस्य सिद्दार्थ बुला आदी सहभागी होणार आहेत.