चंद्रपूर : शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यभरात सहा वज्रमूठ सभा आयोजित केल्या आहेत. यातील पहीली वज्रमूठ सभा संभाजीनगर येथे पार पडली. या सभेला झालेली गर्दी आणि जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाला धास्ती वाटू लागली आहे आणि त्यामुळेच नागपूर येथे १६ एप्रिलला होऊ घातलेल्या वज्रमूठ सभेला स्थानिकांना पुढे करून भाजपा विरोध करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी चंद्रपुरात आले असता स्थानिक जनता महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीची संयुक्त वज्रमूठ सभा येत्या १६ एप्रिलला नागपूर येथे होऊ घातली असून या सभेसाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही तयारीचा आढावा घेण्यासाठी चंद्रपुरात बैठक घेतली असून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सभेला उपस्थित राहतील. राज्यात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्याचे मुख्यमंत्री अयोध्या दौर्‍यावर गेले. अयोध्या दौर्‍याला आपला विरोध नाही मात्र शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेणे सरकारचे काम आहे. सध्या शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले जात आहे. पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाई कधी मिळेल, असा प्रश्न देशमूख यांनी सरकारला केला.

हेही वाचा >>>नागपूर: भटक्या श्वानांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

वाढता धार्मिक द्वेष, लोकशाहीची हत्या, आदी मुद्यांवरून केंद्र व राज्य सरकारविरुद्ध जनतेत रोष आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला. यावेळी पक्षनिरीक्षक प्रवीण कुंटे पाटील, चंद्रीकापूरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहराध्यक्ष राजीव कक्कड, डॉ.अशोक जिवतोडे, अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former home minister anil deshmukh statement that mahavikas aghadi vajramooth meeting is a threat to bjp rsj 74 amy
Show comments