नागपूर : राज्याच्या माजी गृहमंत्र्यांचा चुलत भाऊ आणि त्यांच्या भागीदारांची हॉटेलच्या व्यवस्थापकाने बनावट कागदपत्रांद्वारे बँक खाते उघडून २ लाखांनी फसवणूक केली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपी व्यवस्थापकाला अटक केली. अर्जुन प्रदीप जयस्वाल (३१, उज्ज्वलनगर) असे आरोपीचे नाव आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चुलत भाऊ विक्रांत देशमुख,आशीष सुधाकर कोवळे यांनी २०२० मध्ये बजाजनगर चौकात ‘द कॉमन ग्राऊंड स्पोर्टर कॅफे अँड रेस्ट्रो’ या नावाने भागीदारीत हॉटेल सुरू केले होते. आरोपी अर्जुन हा हॉटेलचा व्यवस्थापक म्हणून नोकरी करीत होता. त्यामुळे हॉटेलच्या आर्थिक व्यवहारापासून ते सर्व कामे तो सांभाळत होता. तो महिन्याच्या शेवटी हिशेब देत होता. दरम्यान, त्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. किरकोळ गोष्टींसाठी तो शिवीगाळ करायचा, अशा काही तक्रारी होत्या. हा प्रकार हॉटेलच्या मालकांना कळताच त्यांनी अर्जुनशी चर्चा केली आणि त्याला २० ऑक्टोबर २०२२ ला नोकरीवरून काढून टाकले.
हेही वाचा – खुशखबर! एमपीएससीतर्फे जम्बो भरती; ‘या’ पदांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या..
अर्जुनने बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या हॉटेलच्या नावाने बँकेत स्वतःच्या नावे खाते उघडले. स्विगी, झोमॅटोद्वारे ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांचे पैसे त्याच्या स्वत:च्या खात्यात जमा केले. जवळपास दोन लाखांची रक्कम त्याने आपल्या खात्यात जमा केली आणि परस्पर काढली. अशाप्रकारे त्याने हॉटेलमालक विक्रांत देशमुख आणि आशीष कोवळे यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केली.