सोलापूर : विधानसभा निवडणुकीत भरघोस बहुमत मिळवून भाजपच्या अधिपत्याखाली महायुती सत्तेवर आल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता असतानाच दुसरीकडे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त पाच सदस्यांमधून वर्णी लागण्यासाठी सोलापुरातील महायुतीच्या माजी आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याचे बोलले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांपैकी सात सदस्यांची नियुक्ती विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झाली होती. उर्वरित पाच सदस्यांच्या नियुक्त्या लवकरच होण्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने सोलापुरात पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, माळशिरसचे याच पक्षाचे माजी आमदार राम सातपुते, बार्शीचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि सांगोलाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील या चौघांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत.

हेही वाचा…Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”

पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांच्याशी तेथील माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे जुळत नव्हते. उलट, साखर कारखाना व इतर काही संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोघेही नेते एकमेकांच्या विरोधात होते. यातून भाजपमध्ये अवताडे आणि परिचारक असे दोन गट पडले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत आमदार समाधान अवताडे यांच्या अडचणी वाढल्या असता अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पंढरपुरात येऊन दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणावे लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परिचारक यांची नाराजी दूर करण्याच्या अनुषंगाने त्यांची महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती. पंढरपुरातून अवताडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर सोपविली होती. त्यानुसार परिचारक यांनी अवताडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यामुळे विधान परिषदेवर त्यांना संधी मिळावी, अशी मागणी त्यांचे समर्थक करू लागले आहेत.

हेही वाचा…रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू

माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला विशेषतः बलाढ्य मोहिते- पाटील गटाला अक्षरशः झुंजविलेले भाजपचे माजी आमदार राम सातपुते हे मूळ संघ परिवारातील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे म्हणून समजले जातात. गेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर सातपुते हे विधान परिषदेवर स्वतःची वर्णी लावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. गेली पाच वर्षे फडणवीस यांच्या मर्जीतील मानले गेलेले आणि विधानसभा निवडणुकीत बार्शीतून भाजपऐवजी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे लढून पराभूत झालेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांचेही नाव विधान परिषदेवर सदस्य नियुक्तीसाठी चर्चेत आहे. परंतु त्यांची वर्णी लागणार का, याकडे सर्वांच्या नजरा खिळून आहेत. सांगोला विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी अलीकडेच समर्थकांच्या बैठकीत, लवकरच आपणास मोठे सत्तापद मिळणार असल्याचा दावा केला होता. त्या अनुषंगाने ते विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त होणार का, याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mahayutti mlas in solapur compete for seat among five legislative council appointees sud 02