नागपूर : राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेवरील खर्च कायमच वादाचा विषय राहिला आहे. याआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी ९० लाख रुपये केवळ जाहिरातीवर खर्च करण्यात आले होते. आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीच्या चाळणी प्रक्रिया आणि मुलाखती दोन दिवस मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाल्याची माहिती आहे. याच मुलाखती मुंबई विद्यापीठात घेतल्या असत्या तर लाखो रुपयांची बचत झाली असती. त्यामुळे कुलगुरू निवड प्रक्रियेवर सरकारी उधळपट्टी का? अशा आशयाचे खरमरीत पत्र माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी राज्यपालांना लिहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठातील कुलगुरू पदासाठी अर्ज मागवताना एकही पैसा आवेदन शुल्क म्हणून घेतला जात नाही. कुलगुरू पदासाठी होणारा खर्च हा विद्यापीठाच्या सामान्य फंडातून केला जातो. परंतु, त्या पदाच्या जाहिराती, छाननी प्रक्रिया, मुलाखती आदींसाठी लाखो रुपये खर्च होतात.

हेही वाचा >>>राम मंदिर सोहळा देशात पुरोहितशाही वाढवणार; मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांचा इशारा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी १० व ११ जानेवारी असे दोन दिवस चाळणी प्रक्रिया, मुलाखती मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये घेण्यात आल्याचे समजते. याच मुलाखती मुंबई विद्यापीठात घेतल्या असत्या तर लाखो रुपयांची बचत झाली असती. हा पैसा विद्यार्थाच्याविकासात्मक कामासाठी वापरता आला असता. तसेच, यातील काही खर्च हा इच्छुक उमेदवारांकडून आवेदन शुल्क आकारून करता आला असता. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये आवेदन शुल्क आकारले जाते तर, जेथे निवड प्रक्रियेत लाखो रुपये खर्च होतात त्या कुलगुरू पदासाठी का नाही, असा प्रश्नही डॉ. खडक्कार यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.

यासंदर्भात विचारणा करण्यासाठी राज्यपाल कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाला फोन आणि संदेश पाठवले. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.ज्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मुलाखती आहेत त्याच विद्यापीठात त्या व्हायला हव्यात. यामुळे पैशांची बचत होईल व त्यानिमित्ताने उमेदवार ज्या विद्यापीठात कुलगुरू व्हायचे ते विद्यापीठही बघू शकतील. याबाबत शासनाने सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी नियमावली तयार करावी. – प्रा. डॉ. संजय खडक्कार, शिक्षणतज्ज्ञ

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former management council member letter to the governor asking why there is government extravagance for selection of chancellor of rashtrasant tukdoji maharaj nagpur university amy