नागपूर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून नेण्यात आले. त्यांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. द्वेष आणि घृणित राजकारणाचा हा परिणाम आहे, असे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे. केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशाप्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला, राज्य सरकारला राज्यात वर्णव्यवस्था आणायची आहे काय, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या राजवटीत राज्यात दलित सुरक्षित नाहीत. या घटनेवरून राज्यात जातिभेद ठळकपणे दिसून येतो. हा जातिभेद संपणार कधी? असा उद्विग्न सवाल डॉ. राऊत यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “बावनकुळे म्हणजे तेली समाज काय?”, भाजपाने विदर्भात एकही जिल्हाध्यक्ष न नेमल्याने समाजात अस्वस्थता

मोलमजुरी करून आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या शालेय दलित विद्यार्थ्यांना चोरीच्या संशायावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चार दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. हे तरुण आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात. नुकताच समाज माध्यमांवर एका मुस्लीम विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील वर्गमित्रांकडून कानाखाली वाजवण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील शिक्षिकाच मुस्लीम विद्यार्थ्याला आक्षेपार्ह बोलताना दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली असताना आता चार दलित तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपद्वारे सातत्याने करण्यात येणारे घृणित राजकारणाचा परिणाम आहे. घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे देशात जातीय अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे, असेही यावेळी डॉ. राऊत म्हणाले.

हेही वाचा : सना खान हत्याकांडाबाबत भाजपचे मौन? फेसबुकवरील छायाचित्रांतून दांडगा जनसंपर्क समोर

संबंधित घटनेतील पीडित तरुण शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड व प्रणय खंडागळे यांना जबर मारहाण करण्यात आली. यातील काही अल्पवयीन व दलित समाजातील आहेत. याप्रकरणी दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळाव्या व तात्काळ अटक करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करावी तसेच पीडितांना संरक्षण द्यावे, त्यांच्या शिक्षणाच्या खर्च शासनाने उचलावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former minister and congress leader nitin raut on atrocities against sc students in the state rbt 74 css