नागपूर पदवीधर मतदार संघात ॲड. अभिजित वंजारी यांना तुम्ही निवडून दिले. आता आम्ही नागपूरकर शिक्षक मतदार संघात चंद्रपूरच्या सुधाकर अडबाले यांना निवडून आणणार, अशी ग्वाही माजी मंत्री तथा काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी येथे दिली. येथील एन डी हॉटेलमध्ये ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ संदर्भात जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा- अमेरिका, कोरिया, मॅक्सिकोच्या तुलनेत भारतात वैद्यकीय उपचार स्वस्त
यावेळी खासदार बाळू धानोरकर, माजी पालकमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार अविनाश वारजुरकर, निरीक्षक पठाण, प्रदेश सचिव रवींद्र देरकर, प्रदेश सचिव जिया पटेल, प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस नेते संदीप गड्डमवार, काँग्रेस नेते विजय नळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चंद्रपूर मध्यवर्ती बँक अध्यक्ष संतोष रावत, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर यांची उपस्थिती होती.
हेही वाचा- वाशीम : शिंदे-फडणवीस सरकार राज्यपालांच्या कृपेने सत्तेवर – नाना पटोले
यावेळी केदार म्हणाले, पदवीधर मतदार संघाचे नागपूर येथील उमेदवार अभिजित वंजारी यांना चंद्रपूर येथील काँग्रेस व पदवीधर युवकांनी साथ देत निवडून आणले. त्याची परतफेड करण्याची जबाबदारी आता नागपूरकर म्हणून आम्हावर आहे. आता शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रपूरचे सुधाकर अडबाले यांना पाठींबा दिला आहे. नागपूरकर म्हणून आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना जिंकून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराजांनी ३० लाखांचे आव्हान स्वीकारले पण…
काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे निर्माण झालेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. या अभियानाचा शुभारंभ येत्या प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामांन्यांना साद घालण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ लोकचळवळ व्हावी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.