वर्धा : तीनवेळा आमदार व एकदा मंत्री राहिलेले अशोक शिंदे स्वगृही म्हणजे परत शिवसेना (उबाठा)मध्ये दाखल झाले आहेत. आज त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. स्वगृही आल्याचे समाधान वाटते, असे ते सर्वप्रथम ‘लोकसत्ता’सोबत बोलताना म्हणाले. मुळात मी कट्टर शिवसैनिक व ठाकरे परिवाराचा अनुयायी. हिंगणघाट व वर्धा जिल्ह्यात सेनेची बांधणी केली. इथल्या लोकांचे प्रेम मिळाल्याने तीन वेळा निवडून आलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला आणि नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद लाभले. पुढे मात्र संवाद राहिला नाही. सेनेच्या काही मंडळींमुळे दुरावा आला. गैरसमज झाले. शांत बसलो. पण राजकीय पिंड म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथेही निराशा आली. म्हणून मग शिंदे यांच्या सेनेत गेलो. तिथे मी ही विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न केले, पण शेवटी कळले की गड्या आपलं गाव बरं. म्हणून भेटी घेतल्या. उद्धव ठाकरे यांनी कोणताही किंतू न ठेवता मला स्वीकारले. आता आपल्याच घरात यायचे होते म्हणून अटीशर्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार, निवडून पण आणणार. जुने सोबती दुरावले होते, पण आता आपलेच घर म्हणून सर्व एकत्र राहू. जिल्ह्यात दौरे सुरू करणार, अशी भूमिका अशोक शिंदे यांनी मांडली.
शिंदे यांनी आमदार, मंत्रिपद व पुढे सेनेचे पूर्व विदर्भ प्रमुख अशी विविध पदे एकसंघ सेनेत असतानाच भूषविली होती. त्यानंतर ते गेल्यावेळी अपक्ष म्हणून पराभूत झाले होते. सेना सोडताना ते करोना काळात वर्षा निवासस्थानी गेले असताना वाईट अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले होते. पुढे काँग्रेस सोडताना पक्ष चांगला, पण नेते नालायक, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या ठाकरे सेनेत आता परत येण्याने काय फरक पडणार, हे पुढेच दिसेल.
शिंदे पक्ष सोडून गेल्यानंतर ठाकरे निष्ठा दाखवून कार्य करणारे राजेंद्र खुपसरे म्हणाले की, शिंदे यांचे पक्षात स्वागतच आहे. कारण त्यांना पक्षात परत घेण्याचा निर्णय सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तो आम्हास मान्यच राहणार. हिंगणघाट विधानसभेची जागा सेनेला मिळावी म्हणून खुपसरे यांनी प्रयत्न केले होते. पण ती आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षास मिळाली आहे.