नागपूर: माजी मंत्री बच्चू कडू यांच्या लेटलतिफीचा फटका देशभरातून नृत्य स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या बालक-बालिकांना बसला. कविवर्य सुरेश भट सभागृहात हा प्रकार घडला.
सकाळी १० ते २ वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचा नागपूर विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर याच सभागृहात दुपारी २ नंतर नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम होता. परंतु सकाळी १० च्या कार्यक्रमाला बच्चू कडू तब्बल दीड तास उशिरा पोहोचले. त्यामुळे नृत्य स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांना सभागृहाबाहेर दोन तास ताटळत बसावे लागले.
सभागृहाच्या व्यवस्थापनाने प्रहारच्या कार्यकर्त्यांना दुपारी २ वाजता सभागृह रिकामे करून देण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी सभागृह रिकामे करून दिले नाही. त्यांचा कार्यक्रम दुपारी ४ वाजेपर्यंत सुरूच होता. कडू यांच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाच्या व्यवस्थापनावर दबाब निर्माण केला.
याच सभागृहात दुपारी २ वाजेपासून अखिल नटराजन आंतर सांस्कृतिक संघ, नागपूरतर्फे आयोजित ऑल इंडिया १७ वे कल्चरल नॅशनल डान्स कन्टेस्ट अँड फेस्टिव्हल ‘नृत्यसंस्कृती’चे आयोजन करण्यात आले होते.
यात देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील मुले-मुली सहभागी झाले होते. केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा या सारख्या राज्यातील स्पर्धक येथे आले होते. ते दुपारी २ वाजता स्पर्धा असल्याने वेशभूषा करून तयार होते. परंतु सभागृहात वेगळाचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे ८ ते १४ वयोगटातील स्पर्धकांना तब्बल दोन तास ताटळत राहावे लागले. तसेच त्यांच्या पालकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला.
नागपूर महापालिकेने कविवर्य सुरेश भट सभागृह खासगी संस्थेला चालवण्यासाठी दिले आहे. या सभागृहाचे व्यवस्थापक बाहुलकर यांच्याशी संपर्क साधला. आणि त्यांना एकाच दिवशी दोन कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून देण्याची कोणाची जबाबदारी कोणाची असे प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रहारचा कार्यक्रम सुरू होता. दुसऱ्या कार्यक्रमाला केवळ एक तास विलंब झाला आहे, असे उत्तर देऊन अधिक भाष्य करण्याचे टाळले.