वर्धा : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रा.वसंतराव कार्लेकर यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.ते ८८ वर्षाचे होते.त्यांच्यावर उद्या सकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.१९७२ ते १९७८ या कालावधीत ते आमदार होते.त्यावेळी विधानसभेचा कालावधी एक वर्ष वाढविण्यात आला होता.पुढे त्यांनी आयुष्यभर शरद पवार यांच्याशी निष्ठा जोपासली.त्याच स्नेहाने त्यांची राजकीय वाटचाल चालली.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ते पाच पैकी एक विश्वस्त होते.
तसेच पवार मुख्यमंत्री असताना कार्लेकर यांना एस टी महामंडळाचे संचालकपद मिळाले होते. पुढे पणन महासंघाचे त्यांनी दीर्घकाळ संचालकपद भूषविले.कापूस क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यास राहला.राज्य शासनाने कापूस धोरण राबविताना नेहमी त्यांचा सल्ला घेतला होता.पवार यांचा वर्धा दौरा कार्लेकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नसे.त्यांच्या निधनाने एक अभ्यासू नेता हरविल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.