काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या तिहेरी राजकीय संकटात अडकल्याचे चित्र आहे. त्यांच्या भंडारा या गृहजिल्ह्यात जिल्हा परिषदेत सत्ताबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या पदवीदर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवारांवरून पटोलेंची डोकेदुखी वाढली आहे, तर त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर माजी आमदार आशीष देशमुख यांनी आक्षेप घेतले आहे. या तिहेरी संकटातून पटोले कसे बाहेर पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा- एकनाथ निमगडे हत्याकांड; आणखी एका ‘शार्पशुटर’ला अटक
पटोले यांचा भंडारा हा गृह जिल्हा. भंडारा जिल्हा परिषदेत सध्या सत्ताबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह तीन जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणाने भाजपमधून निलंबित माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह पटोले यांचेही ‘टेंशन’ वाढले आहे. जिल्हा परिषदेला महिला अध्यक्ष देण्याचे पटोले यांचे स्वप्न भंगणार तर नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, सोमवारी रात्री चरण वाघमारेंच्या तुमसर येथील हॉटेलमध्ये नाना पटोले आणि चरण वाघमारे यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीदर मतदारसंघाच्या उमेदवार निवडीमध्ये पटोले सपशेल अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. नाशिक आणि नागपूरमधील उमेदवारीवरून पटोले पूर्णपणे चुकले, अशी चर्चा त्यांच्याच पक्षात दबक्या आवाजात रंगली आहे.
यावरून त्यांच्या पक्षाचे माजी आमदार आशीष देशमुख यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील काँग्रेसची चिंताजनक परिस्थिती असल्याचे सांगत थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. यामुळे पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदावरही आता उघडपणे आक्षेप घेतले जात आहे. पटोले या तिहेरी संकटांचा सामना कसा करणार आणि त्यातून कसे बाहेर पडणार, भंडारा जिल्हा परिषदेत सत्ताबदल होणार का, आ. देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर घेतलेले आक्षेप पटोले कसे खोडून काढणार, हे पाहणे भंडारा जिल्हावासीयांसह राजकीय वर्तुळासाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा- नागपुरात काँग्रेसचा अडबाले यांना पाठिंबा; शिक्षक मतदार संघ निवडणूक
जि.प.उपाध्यक्षांसह तिघांना उच्च न्यायालयाचा दणका
भाजपामधून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार चरण वाघमारे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चरण वाघमारे गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले यांच्यासह तीन सदस्यांवरील अपात्रतेची सुनावणी आता भंडारा जिल्हाधिकारी न्यायालयात होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईबाबत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी घेऊ नये, अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. यामुळे तिन्ही सदस्यांच्या अपात्रतेची सुनावणी आता भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या न्यायालयात होणार आहे. संदीप टाले, उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. एका महिन्यात या प्रकरणाची सुनावणी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.