लोकसत्ता टीम
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस सध्या तळ्यात-मळ्यातच्या भूमिकेत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात ठिकाणी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून दोन ठिकाणी समर्थन जाहीर देखील केले. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकरांविरोधात अकोल्यात उमेदवार द्यावा का? यावरून काँग्रेसमध्ये खल सुरू आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस अंतर्गत दबाव वाढत आहे. या संदर्भात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. राज्यात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी ते आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसपुढे राज्यातील त्यांच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला. कोल्हापूर व नागपूरमध्ये बिनशर्त समर्थन देखील जाहीर केले. वंचितकडून एकतर्फी पाठिंबा दिला जात असल्याने काँग्रेसवर नैतिक दबाव वाढत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा-वीजसंकट टळले! कोराडीतील ‘या’ संचातून वीजनिर्मिती सुरू
दरम्यान, आता काँग्रेसमधूनच ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची मागणी होत आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पक्षाध्यक्षांसह खा.राहुल गांधी, पक्षप्रभारी व काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठांना पत्र पाठवून आंबेडकरांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. पत्रात ते म्हणाले, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. ‘मविआ’मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. ‘मविआ’च्या मुंबईतील सभेत देखील सहभागी झाले. त्यांनी २७ मार्चपर्यंत प्रतीक्षा केली. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पहिल्या टप्प्यामधील उमेदवार जाहीर केले. कोल्हापूर व नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवारांना समर्थन सुद्धा दिले आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अकोल्यात काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा.’
उर्वरित टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून त्यांना महाविकास आघाडीमध्ये सहभागी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टळू शकेल. त्यांनी अनेक जिल्ह्यात मोठ-मोठ्या सभा घेऊन पंतप्रधान मोदींविरुद्ध भूमिका मांडली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणे काँग्रेस व ‘मविआ’च्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याचा दावा सानंदा यांनी पत्रात केला आहे.