यवतमाळ : येथील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी शिक्षक आमदार, भाजपचे माजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष दिवाकर बळवंत पांडे (८३) यांचे १ मार्चच्या रात्री १ वाजून ३० मिनिटांनी निधन झाले. मृत्यूपरांत त्यांचे नेत्रदान करण्यात आले.
हेही वाचा >>> काँग्रेसचे ६ ते ३१ मार्चदरम्यान राज्यव्यापी आंदोलन; १३ मार्चला ‘चलो राजभवन’; रायपूर अधिवेशनात निर्णय
दिवाकरराव पांडे हे बालाजी सोसायटी व बालाजी देवस्थानचेही अध्यक्ष राहिले आहेत. येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयातील इंग्रजी व इतिहासाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. सुरुवातीची माध्यमिक शिक्षक परिषद, पुढे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले शिक्षक आमदार म्हणूनही त्यांनी मोठी कामगिरी बजावली. यवतमाळ डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेल्या दिवाकराव पांडे यांचा शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून गाव पातळीपासून विधिमंडळापर्यंत लौकिक होता.
हेही वाचा >>> अमरावतीत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर ‘अभाविप’चा झेंडा; काँग्रेसकडून कारवाईची मागणी
आमदारकीची मुदत संपल्यानंतर ते यवतमाळ जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निवडले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, संघ व अन्य क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे कर्मठ कार्यकर्ते, सामाजिक कामातही हिरीरीने पुढे होते. विविध विचारांच्या व्यक्ती, संस्था व संघटनांशी त्यांचा निकटचा स्नेह होता. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला, धनंजय व संजय ही दोन मुले, मंजुषा ही विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.