गोंदिया : गोंदिया विधानसभेची जागा काँग्रेसला की शिवसेना (उद्धव ठाकरे) ला ही चर्चा गेल्या एक महिन्यापासून सुरू होती. अखेर २४ ऑक्टोबरला रात्री काँग्रेसची यादी जाहीर झाली आणि त्यात गोंदियाची जागा पुन्हा काँग्रेसलाच देण्यात आली. नुकतेच काँग्रेस पक्षात घरवापसी केलेले माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली. गोपालदास अग्रवाल यांना चौथ्यांदा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसकडून २००४, २००९, २०१४ अशा लागोपाठ तीन निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विजय मिळविलेला आहे.

त्यापूर्वी दोन टर्म ते विधान परिषदेचे सदस्य होते. दरम्यान आपल्या वरिष्ठतेनुसार आपल्याला मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा असतानाही २००४ आणि २००९ मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. याबाबत त्यांचा गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होता की. त्यांच्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कुणी इतर नेता मोठा होऊ नये याकरिता आघाडी शासनात मला मंत्री मिळू देत नाही. मात्र २०१४ मध्ये भाजप – सेना युतीची सत्ता आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असताना गोपालदास अग्रवाल यांना लोक लेखा समितीचे अध्यक्ष केले. २०१४ पासून २०१९ पर्यंत ते सत्तेच्या जवळच राहिले २०१९ मध्ये त्यांनी शेवटच्या क्षणी भाजप पक्षात प्रवेश केला आणि गोंदिया विधानसभेची तिकीट मिळवली. पण भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर गेली पाच वर्षे त्यांनी भाजपमध्येच काढली आणि नुकतेच १३ सप्टेंबरला त्यांनी गोंदियातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला. त्यामुळे गोंदिया विधानसभेत पुन्हा २०१४,२०१८ सारखीच लढत २०२४ मध्येही होऊ घातली आहे.

हेही वाचा…Nitin Gadkari : VIDEO : “राजकीय नेत्यांना त्यांच्या मुलांच्या तिकीटाची चिंता, पण आम्हाला…”; नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

तिरोड्यातील उमेदवारी शरद पवार गटाला

तिरोडयाची जागाही काँग्रेस पक्ष आपल्याकडेे घेणार असल्याची चर्चा असतानाच ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) ला गेली आहे. तिरोडयातून गुड्डू बोपचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तिरोडा विधानसभेतही २०१९ सारखीच लढत होणार आहे. २०१९ ला गुड्डू बोपचे हे संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते तसेच भाजपकडून विजय रहांगडाले हे उमेदवार होते. चुरशीच्या झालेल्या लढतीत भाजपचे विजय रहांगडाले यांनी रविकांत बोपचे यांचा पराभव केला होता.