यवतमाळ: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्यासह सहा जणांना शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे तथा मालमत्ता चोरून नेल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल पांढरकवडा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप नाईकवाड यांनी आज सोमवारी दिला.
कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदीदरम्यान शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य दर मिळत नसल्याच्या कारणातून शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा सुरू असताना २९ नोव्हेंबर २०१३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने बाजार समितीच्या मालमत्तेचे जाळून नुकसान केले. याप्रकरणी माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या जाळपोळीत तीन लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी आंदोलकांनी एक लाख १२ हजार रुपयाचे साहित्य चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायधीश प्रदीप नाईकवाड यांनी निकाल दिला. माजी आमदार प्रा. राजू तोडसाम, नारायण भानारकर, किशोर घाटोळ, विकेश देशट्टीवार, सुधीर ठाकरे, नंदकिशोर पंडित यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. संशयाचा फायदा घेत गिरीश वैद्य, संजय वर्मा, सुभाष दरणे आणि सुनील बोकीलवार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.