अकोला : विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी दुपारी अपघाती निधन झाले. शिवणी विमानतळावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन ते परत येत असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर जबर धडक दिली. या अपघातात प्रा.बिडकर यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

शिवणी विमानतळावर महसूलमंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी तुकाराम बिडकर दुचाकी वाहनाने गेले होते. शिवणी विमानतळावरून परत येत असताना शिवर गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील प्रा. तुकाराम बिडकर व त्यांचे मित्र प्रा.राजदत्त मानकर गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ वाहनातून रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या मालवाहू वाहनातून जनावरांची वाहतूक करण्यात येत होती. वाहन वेगाने नेण्याच्या नादात हा दुर्दैवी अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही महिन्यांपूर्वीच प्रा.तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झाल्यावर मुंबई येथे उपचार करून ते पूर्ण बरे झाले होते. आज पुन्हा दुचाकी अपघातात काळाने त्यांच्यावर घाला घातला.

प्रा. तुकाराम बिडकर यांच्या राजकीय प्रवासाला जिल्हा परिषदेतून सुरुवात झाली. ते जि.प. सदस्य, सभापती होते. २००४ ते २००९ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रा.तुकाराम बिडकर यांनी प्रतिनिधित्व केले आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. अभ्यासपूर्ण कार्यातून त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती. विदर्भामध्ये माळी समाजातील ते मोठे नेते होते. अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे ते पदाधिकारी होते. राजकीयसह सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. अकोला जिल्ह्यात त्यांच्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा, महाविद्यालय आहेत. विविध चित्रपटात देखील त्यांनी अभिनय केला आहे. सध्या ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते होते. प्रा. तुकाराम बिडकर यांच्या अपघाती निधनामुळे पश्चिम विदर्भात मोठी शोककळा पसरली असून अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Story img Loader