नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. त्यावरून काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले होते. त्याविरोधात भाजपाने तक्रार केली आणि २४ तासांत अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हुसेन यांना दुसऱ्या एका प्रकरणात अटक झाली आहे.
नागपुरातील ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये एक कोटी ५९ लाख ५२ हजार रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हुसेन आणि आणखी एकाला अटक झाली आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांना ईडी कार्यालयात चौकशीला बोलावण्यात आले होते. त्याविरोधात नागपुरात ईडी कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केले होते. यावेळी बोलताना शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.
हेही वाचा – नागपूर : …अन चोरांनी चक्क मलवाहिनीवरील झाकण चोरून नेले
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हुसेन यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती व अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांत ताजबाग ट्रस्टमध्ये घोटाळा प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. हुसेन या ट्रस्टचे माजी अध्यक्ष आहेत.