लोकसत्ता टीम
अकोला : जिल्ह्यातील माजी आमदार हरिदास भदे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री येथे उद्धव ठाकरेंकडून शिवबंधन बांधून घेत ते शिवसेनेत दाखल झाले. हरिदास भदे वंचित आघाडीतून राष्ट्रवादी व आता राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भदे ठाकरे गटाच्या संपर्कात होते. मुंबई येथे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन पक्षप्रवेशावर चर्चा केली. त्यानंतर आज, रविवारी ते शिवसेनेत दाखल झाले. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आदी उपस्थित होते. भदे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला.
आणखी वाचा-वडेट्टीवार म्हणतात, ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नको, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा
२००४ आणि २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सध्याच्या अकोला पूर्व मतदारसंघातून तत्कालीन भारिप-बमसंच्या तिकीटावर भदे निवडून आले होते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्येही ते पराभूत झाले. मतभेद व पक्षात नाराज असल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोडून बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत मात्र ते फारसे सक्रिय झाले नाहीत. आता निवडणुका जवळ येताच त्यांनी ठाकरे गटाची वाट निवडली. भदे यांच्या प्रवेशामुळे अकोला पूर्व मतदारसंघात शिवसेनेकडे दावेदार वाढले आहेत. तिकीटासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.