राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘हनी ट्रॅप’चे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एक माजी सरपंच ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला. महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्याच्याजवळचे साडेपाच हजार रुपये घेऊन पोबारा केला. यानंतर माजी सरपंचाने पोलिसांत तक्रार केली आणि पोलिसांनी या ‘देशी हनी ट्रॅप’चा भंडाफोड करीत महिलेसह तिच्या सहकाऱ्यांना बेड्या ठोकल्या.
भ्रमणध्वनीवर संपर्क साधून गोड आणि मादक आवाजात एखाद्या पुरुषाला शरीर सुखाची ‘खुली ऑफर’ द्यायची. शहर परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी त्याला बोलवायचे आणि महिलेच्या चारपाच सहकाऱ्यांनी तिथे अचानक धाड मारायची. पुरुषाला बदनामी करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे लुबाडायचे आणि पळ काढायचा, अशी या ‘देशी हनी ट्रॅप टोळी’ ची कार्यपद्धती. बदनामीच्या भीतीने कुणी पोलिसांत जात नसल्याने टोळीचं चांगभलं व्हायचं. दोन तीन तासांच्या खेळात हजारो रुपये, मोबाईल, दागिन्यांची कमाई होत असल्याने या खेळातील हिरोईन आणि तिच्या सहकाऱ्यांची हिंमत वाढली.
रविवारी ‘त्या’ महिलेने बुलढाणा तालुक्यातील एका माजी सरपंचाला जाळ्यात ओढले. माजी सरपंच सांगितल्याप्रमाणे शहरातील डीएड महाविद्यालयानजीकच्या निर्मनुष्य परिसारत पोहोचले. दोघेही तयारीने जवळ आले नाही तोच तेथे महिलेचे पाच सहकारी पोहोचले. ‘आम्ही तुमची चित्रफीत तयार केली आहे. ती प्रसारित होऊ द्यायची नसेल तर १ लाख द्या’, अशी धमकी त्यांनी माजी सरपंचाला दिली. माजी सरपंचांना मारहाण करून त्यांच्याजवळचे साडेपाच हजार रुपये हिसकावून टोळीने पळ काढला.
आपण फसल्याचे लक्षात येताच माजी सरपंचांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. अवघ्या काही तासातच पोलिसांनी ५ आरोपीसह २३ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. कृष्णा भास्कर पवार (२४, रा. आनंदनगर), अजय सुनील वीरशीद (२२, रा. जगदंबा नगर), रुपेश शंकर सोनवणे (२२, रा. शिवशंकर नगर), संतोष सखाराम जाधव (३५, रा. जुना अजिस्पूर रोड, सागवान) आणि एक १७ वर्षीय युवक व २३ वर्षीय महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे.