गोंदिया : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून चारच्या संख्येत गावात आलेल्या नक्षल्यांनी माजी सरपंचाची हत्या केली. गोंदिया जिल्हा शेजारील ही घटना बालाघाट जिल्ह्यातील लांजी पोलीस ठाण्याअंतर्गत भक्कुटोला येथे शुक्रवारी घडली. मृताचे नाव शंकर पंधरे (५४) असे आहे.
गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यांचा वापर नक्षली रेस्ट झोन म्हणून करतात. छत्तीसगड राज्य, गडचिरोली येथे घातपात कारवाया केल्यानंतर ते लपण्यासाठी आणि विश्राम करण्यासाठी करत असतात. या परिसरात आता पोलिसांचे बळ वाढल्यामुळे नक्षली कारवाया कमी झाल्या आहेत. बालाघाट जिल्ह्यात सातत्याने पोलिसांकडून कारवाया सुरू आहेत. शुक्रवारी बालाघाट जिल्ह्यातील लांजी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भक्कुटोला येथील शंकर पंधरे या माजी सरपंचाला पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या कारणावरून चारच्या संख्येत गावात आलेल्या बंदुकधारी नक्षल्यांनी भर चौकात फरफटत आणून ठार केले. यामुळे भक्कुटोला परिसरात भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा – मेडीगड्डा धरणाला पुनर्बांधणीची गरज, केंद्रीय पथकाचे ताशेरे
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणुकीचा प्रचार जोरावर असल्याने सुरक्षा यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच लांजी पोलिसांनी भक्कुटोला येथे धाव घेतली. संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली. गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातदेखील या घटनेमुळे गस्त, शोधमोहीम वाढविण्यात आली आहे.