नागपूर : भाजप नेते व कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मुंबईत मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीसंदर्भात काढलेल्या सूचना पत्रात भाजपचे जिल्हाध्यक्ष व दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांचा उल्लेख दक्षिण नागपूरचे आमदार असा करण्यात आल्याने या भागाचे विद्यमान आमदार मोहन मते यांचे समर्थक संतप्त झाले असून कोहळे आमदार कधी झाले, असा सवाल त्यांनी समाजमाध्यमांवर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ” ओबीसींबाबत आपुलकी असती तर …”; अनिल देशमुखांची बावनकुळेंवर टीका, म्हणाले….

उमरेड मार्गावरील बहादुरामधील शिवम फुड्समधील कामगारांच्या प्रश्नावर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मंगळवारी दुपारी ३ मुंबईत मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी काढण्यात आलेल्या पत्रात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सुधाकर कोहळे यांचा उल्लेख आमदार दक्षिण नागपूर असा करण्यात आला आहे. सध्या मोहन मते हे दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याऐवजी कोहळेंचा आमदार म्हणून उल्लेख मते समर्थकांना अस्वस्थ करून गेला. त्यांनी ‘कोहळे दक्षिण नागपूरचे आमदार कधी झाले’ असा सवाल केला आहे. दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे कोहळे व मते असे दोन गट आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने कोहळे यांच्याऐवजी मते यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून कोहळे पक्षावर नाराज होते. ती दूर करण्यासाठी त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्ष केले आहे. तेव्हापासून ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. यातच आता कामगार मंत्र्यांच्या बैठकीच्या सूचनापत्रात मतेंऐवजी कोहळे यांचा उल्लेख आमदार असा करण्यात आल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे. कोहळे हे गडकरी समर्थक तर आ. मते फडणवीस समर्थक मानले जातात हे येथे उल्लेखनीय.