राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकांवर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी एका संघटनेला लाभ पोहचवण्यासाठी प्रभाव टाकत असल्याची तक्रार राज्यपालांकडे झाली असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावर कुलगुरूंच्या बंगल्यावर मंचाची बैठक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला असून बंगल्यावरील सीसीटीव्ही तपासा, संपूर्ण सत्य समोर येईल, अशी मागणी काही माजी प्राधिकरण सदस्यांनी केली आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश
विद्यापीठाच्या विधिसभा निवडणुकीबाबत वातावरण तापले आहे. खुद्द कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी मनमानी धोरण राबवून निवडणुकीत विशिष्ट उमेदवारांना अनुकूलता दाखवल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी माजी विधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर आता कुलगुरूंचा बंगला हा एका संघटनेचे कार्यालय झाल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कुलगुरू आणि शिक्षण मंचचे नजिकचे संबंध शैक्षणिक क्षेत्रात सर्वश्रूत आहेत. असे असले तरी कुलगुरू हे कायद्यानुसार संविधानिक पद आहे. तरीही निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या बंगल्यावरच मंचाच्या बैठक सुरू असल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले.
हेही वाचा >>>अकोला : पश्चिम विदर्भात कपाशीवर ‘दहिया’, उत्पादनावर परिणाम शक्य
पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘पार्टी’
मतदारांना खूश करण्यासाठी विद्यापीठामध्ये वर्चस्व असणाऱ्या संघटनांकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या निवडणुकांनाही ‘वलय’ लाभल्याची चर्चा आहे. प्राधिकरणांमधून विधायक कार्य व्हावे अशी अपेक्षा असताना अशाप्रकारच्या पार्ट्यांमधून निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली जात असल्याची चर्चा आहे.