नागरिकांकडून कायदा हाती घेण्याचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी असलेल्या पोलिसांवर लोक हल्ला करण्याच्या घटना नवीन नाहीत. पण, गेल्या २४ तासांमध्ये शहरातील वेगवेगळया भागांमध्ये लोकांनी कायदा हाती घेऊन खाकी वर्दीला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. मानकापूर, हुडकेश्वर, गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांवर हल्ले करण्यात आले. मंगळवारी दुपारी सदर पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक पोलिसावर चौथा हल्ला झाला होता. या घटनांनी शहरात एकच खळबळ उडाली असून लोकांनी कायदा हाती घेऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.

मुजोर ऑटोचालकांचा वाहतूक शिपायांवर हल्ला

गणेशपेठ

बुधवारी

दु. १.००

रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या ऑटोंवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोन वाहतूक शिपायांवर पोलिसांवर ऑटोचालकांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानकाजवळील हॉटेल राहुल डिलक्स समोर घडली. या घटनेने परिसरात काही काही प्रचंड तणाव निर्माण झाला. गणेशपेठ परिसरात ऑटोचालक व खासगी प्रवासी वाहतूक करणारे दादागिरी करीत असून पोलीस आयुक्तांनी तांच्यावर कारवाईची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोनू कांबळे रा. बेलतरोडी व मयूर राजूरकर रा. रामबाग या ऑटोचालकांना अटक केली. हवालदार किशोर धपके व शिपाई प्रकाश सोनोने,अशी जखमी वाहतूक पोलिसांची नावे आहेत. दोघेही वाहतूक शाखेच्या कॉटन मार्केट झोनमध्ये कार्यरत आहेत. किशोर धपके व प्रकाश सोनोने हे जामर कारवाई पथकात आहेत. दुपारी ते बसस्टॅण्ड भागात कारवाई करीत होते. पोलिसांनी एमएच-४९, ई-४७०७ व एमएच-४९, ई- ०५३० या क्रमांकाच्या ऑटोला जामर लावले. त्यामुळे सोनू व मयूर संतापले. दोघांनी वाहतूक पोलिसांसोबत वाद घातला. वाद विकोपाला केला. दोघांनी वाहतूक पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. तणाव निर्माण झाला. पोलिसांनी ऑटोचालकांना अटक केली.

महिला शिपायाचा विनयभंग

हुडकेश्वर

मंगळवारी

रात्री ११ .००

कौटुंबिक भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला तर महिला शिपायाचा विनयभंग करण्यात आला. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत गजानननगर परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चार जणांना पोलिसांनी अटक केली.

धीरज रमेश बांगरे (३६), निरज रमेश बांगरे (३२), वर्षां निरज बांगरे आणि रजनी रमेश बांगरे (६०) सर्व रा. दर्शन कॉलनी, नंदनवन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. धीरज बांगरे याचा त्याच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. ती सध्या माहेरी राहते. तिला परत आणण्याचे धीरजने प्रयत्न केले, पण ती त्याच्यासोबत यायला तयार नव्हती. मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धीरज पत्नीच्या माहेरी गजानननगरमध्ये गेला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. कुणीतरी ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच हुडकेश्वरचे शिपाई प्रमोद हे घटनास्थळी गेले. धीरजने त्यांना मारहाण केली. त्यामुळे प्रमोदने हुडकेश्वर पोलिसांना फोन करून मदत मागितली. रात्रपाळी अधिकारी महिला फौजदार, हवालदार मोहनदास, ठाकूर आणि तीन चार शिपायांना घेऊ न एक पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी धीरज आणि निरजला ठाण्यात चलण्यास सांगताच धीरजने महिला फौजदाराला शिवीगाळ केली. शिपाई प्रमोदने त्याला रोखले. त्यावेळी इतरांनी पोलिसांना मारहाण केली. धीरजने महिला फौजदाराचे केस पकडून त्यांना पोलीस वाहनावर ढकलले. पोलिसांना मारहाण झाल्याचे समजताच अधिक कुमक घटनास्थळी पाठवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

निरीक्षकांच्या वाहनावर मद्यपिंची दगडफेक

मानकापूर

मंगळवारी

रात्री ११ .३०

मद्य प्राशन करून रस्त्यावर राडा घालणाऱ्या तरुणांच्या टोळक्याने पोलीस निरीक्षकांच्या वाहनावर दगडफेक केली. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजता मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरस गेट परिसरात घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी पळून गेले.

वीरेंद्र दिनेश काळबांडे (२६) रा. गोधनी, सूर्यवंशी लेआऊट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर मानकापूर भागात राहतात. मंगळवारी त्यांची रात्रपाळी होती. त्यांना घरून आणण्यासाठी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास वाहनचालक विकास महेंद्र यादव (३०) हे आपल्या एका सहकाऱ्यासह त्यांना घेण्यासाठी जात होते. फरस गेट परिसरातून जात असताना रस्त्यावर काही तरुण मद्य प्राशन करून राडा घालत होते. पोलिसांचे वाहन बघून ते अधिकच आक्रमक झाले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. एक दगड कारमधील वायरलेस सेटला लागला. त्यात विकास थोडक्यात बचावले. दरम्यान, शिपायांनी आरोपी वीरेंद्रला ताब्यात घेतले. इतर तरुण पळून गेले. मानकापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हांडे यांनी गुन्हा दाखल केला. आतापर्यंत एकूण तिघांना अटक केली.